स्वतंत्र योजना बनगाव योजनेसोबत जोडण्याचा घाट
By Admin | Updated: May 18, 2014 23:40 IST2014-05-18T23:40:33+5:302014-05-18T23:40:33+5:30
आजघडीला आमगाववासीयांना स्वंतत्र पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु ग्रामपंचायतने येथील वाढीव पाणी पुरवठा योजना बनगाव प्रादेशीक पाणी

स्वतंत्र योजना बनगाव योजनेसोबत जोडण्याचा घाट
आमगाव : आजघडीला आमगाववासीयांना स्वंतत्र पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु ग्रामपंचायतने येथील वाढीव पाणी पुरवठा योजना बनगाव प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेला जोडण्याचा घाट रचला आहे. अशात येथील नागरिकांच्या तोंडाचे पाणी पळविण्याचा प्रकार केला जात असल्याने येथील ग्राम पंचायत पदाधिकारी व सदस्यांप्रती नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. नागरिकांच्या नाराजगीचा कधीही स्फोट आंदोलनाच्या माध्यमातून होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. आमगाव ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी नवीन जलकुुंभ व जलशुद्धीकरण यंत्राची व्यवस्था शासनाकडून करण्यात येत आहे. या स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेद्वारे येथील १५ हजार नागरिकांना व्यवस्थीतपणे पाणी पुरवठा सुरु आहे. एवढेच नव्हेतर वाढत्या लोकसंखेला लक्षात घेता शासनाकडून ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत दोन कोटींची वाढीव पाणी पुरवठा योजना सुरू करुन येथील नागरिकांसाठी संजीवनी देण्यात आली. परंतु ग्रामपंचायतच्या व स्थानिक जनप्रतिनिधींच्या लालसेमुळे ही योजना आॅक्सिजनवर असलेल्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला जोडण्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे. या संदर्भात नागरिकांना दिशाभूल करुन ठरावही संमत करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. ४८ गावांना पाणी पुरवठा करणारी बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अनेक वर्षांपासून रेंगाळत पाणी पुरवठा करित आहे. या योजनेत समाविष्ट गावांनी पाणी मिळत नसल्याने यातून माघार घेतली. तर अनेक गावातील पाणीपट्टी वसुली होत नसल्याने व जिल्हा परिषद पाणी पुरवठा योजनेच्या उदासिन धोरणामुळे योजना अखेरची घटका मोजत आहे. या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत फक्त उर्वरीत २८ गावांना पाण्याचा पुरवठा होत आहे. परंतु वारंवार जिल्हा परिषदे व स्थानिक प्रशासनामुळे या योजनेचे थकीत बील ५० लाख रुपयांपर्यंत पोहचत असते. विद्युत भरणा व योजनेवरील खर्च भागत नसल्याने ही योजना वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचीत रहावे लागत आहे. या योजनेचे अपयश लपविण्यासाठी आमगाव ग्रामपंचायत व स्थानिक जनप्रतिनिधींनी आमगावच्या स्वतंत्र योजनेला बनगाव पाणी पुरवठा योजनेत समायोजीत केले. यामुळे मात्र आमगाववासीयांना पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे. सदर योजनेसंदर्भात निर्णय क्षमता नसणार्या ग्रामपंचायतला विर्सजीत करून पदाकिधारी व सदस्यांनी राजीनामे सोपवावे अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)