वन्यजीव विभागाच्या अनास्थेने पर्यटक वंचित

By Admin | Updated: May 7, 2014 18:43 IST2014-05-07T18:43:30+5:302014-05-07T18:43:30+5:30

जिल्ह्यासाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे एक वरदान लाभलेले आहे. मात्र येथील वन्यजीव विभागाच्या अनास्थेमुळे प्रकल्पांत पर्यटनाला पाहीजे तसे सुगीचे दिवस अजूनही आलेले नाही.

Anesthesia of wildlife department deprives tourists | वन्यजीव विभागाच्या अनास्थेने पर्यटक वंचित

वन्यजीव विभागाच्या अनास्थेने पर्यटक वंचित

गोंदिया : जिल्ह्यासाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे एक वरदान लाभलेले आहे. मात्र येथील वन्यजीव विभागाच्या अनास्थेमुळे प्रकल्पांत पर्यटनाला पाहीजे तसे सुगीचे दिवस अजूनही आलेले नाही. वन्यजीव विभागाकडून पाहिजे तसा प्रचार-प्रसार होत नसल्याने पर्यटक विभागाकडून पुरविण्यात येणार्‍या सुविधांपासून वंचित राहात असल्याचे चित्र आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प जिल्ह्याला वरदान आहे.

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्याला प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने जिल्ह्याची देशपातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली आहे. यामुळेच विदेशी पर्यटकसुद्धा या व्याघ्र प्रकल्पाकडे आकर्षित होत आहेत. असे असतानाही पाहिजे त्या प्रमाणात या व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनात भर पडलेली नसल्याचे दिसते. त्यामाचे मुख्य कारण म्हणजे येथील वन्यजीव विभागाची अनास्था असल्याचे बोलले जात आहे. त्याचे असे की, १५ आॅगस्ट (स्वातंत्र्य दिन), २६ जानेवारी (गणतंत्र दिन) व १ मे (महाराष्ट्र दिन) या दिवशी व्याघ्र प्रकल्प म्हणा वा अभयारण्यात नि:शुल्क सफारीची सुविधा पुरविण्याचे शासन आदेश आहेत. या दिवशी पर्यटकांना वन विभागाकडून निशुल्क प्रवेश दिला जातो. त्यासाठी वाहनांची सोयही करण्यात येते. जंगल सफारी करवून त्यांना प्रवेशद्वारावर आणून सोडले जाते. यंदा १ मे रोजी वन्यजीव विभागाने पर्यटनाला चालना मिळावी व पर्यटकांची कोंडी होऊ नये या उद्देशातून नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचे सडक अर्जुनी तालुक्यातील बकी व पितांबरटोला हे दोन नवे प्रवेशद्वार सुरू केले. तसेच या दोन्ही प्रवेशद्वारांवरून निशुल्क प्रवेशाची सुविधा पर्यटकांना उपलब्ध करवून दिली. यासाठी बकी प्रवेशद्वारवरून ११ तर पितांबरटोला प्रवेशद्वारवरून आठ वाहन सोडण्यात आले. यामुळे येथे आलेल्या मोजक्याच पर्यटकांना या सुविधेचा लाभ घेता आला.

विशेष म्हणजे, वन्यजीव विभागाकडून दोन नवे प्रवेशद्वार सुरू करण्यात येत असल्याबाबत तसेच महाराष्ट्र दिनी पर्यटकांसाठी निशुल्क प्रवेशाची सुविधा उपलब्ध करवून दिली जाणार असल्याबाबत प्रचार व प्रसिद्धी केलीच नाही. एवढेच नव्हे तर वर्तमानपत्रांच्या माध्यमातूनही यासाठी साधी बातमीही पुरविण्यात आली नाही. यामुळे पर्यटकांना वनविभागाकडून पुरविण्यात येत असलेल्या या सुविधेबाबत माहिती मिळाली नाहीच. परिणामी मोजक्याच लोकांना निशुल्क सफारीचा आनंद लुटता आला. ही ठरावीक या घटनेपुरतीच मर्यादीत बाब नाही, मात्र वन्यजीव विभाग नेहमीच प्रचार-प्रसिद्धीच्या बाबतीत फेल ठरत असल्याने निसर्गाने दिलेल्या वरदानाचा आनंद लुटण्यापासून मात्र पर्यटक वंचित राहत असल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)

नियमानुसार महाराष्ट्र दिनी नि:शुल्क सफारीची सुविधा देण्यात आली. यासाठी आमच्या वेबसाईटवर माहिती टाकण्यात आली आहे. वृत्तपत्रांमधून मात्र याबाबतची प्रसिद्ध करण्यात आली नाही. - एल.एल.ठवरे वन्यजीव संरक्षक, गोंदिया

Web Title: Anesthesia of wildlife department deprives tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.