अन्... संपूर्ण गावाने एकाच वेळी एका सुरात गायिले राष्ट्रगीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:32 IST2021-08-24T04:32:44+5:302021-08-24T04:32:44+5:30

सौंदड : कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षापासून प्रत्येकच सण-उत्सवाच्या जल्लोषावर विरजण पडले आहे. अशातच देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिवस ...

And ... the whole village sang the national anthem in unison at the same time | अन्... संपूर्ण गावाने एकाच वेळी एका सुरात गायिले राष्ट्रगीत

अन्... संपूर्ण गावाने एकाच वेळी एका सुरात गायिले राष्ट्रगीत

सौंदड : कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षापासून प्रत्येकच सण-उत्सवाच्या जल्लोषावर विरजण पडले आहे. अशातच देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिवस देखील मर्यादित गर्दीत साजरा करण्याचे निर्देश असल्याने अनेकांची निराशा झाली. तालुक्यातील सौंदड येथील ग्रामपंचायतने अनोखी शक्कल लढवित संपूर्ण गावाला स्वातंत्र्य दिवसाच्या आनंदात सहभागी करून घेतले. हा जिल्ह्यातीलच नव्हे तर कदाचित राज्यातीलच पहिला वहिला प्रयोग असावा !

७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालयात युवा शक्ती मंच व जनशक्ती युवा पॅनलच्या संयुक्त वतीने संपूर्ण गावात साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून एकाच वेळी संपूर्ण शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, शासकीय व निमशासकीय कार्यालय व संस्था आदी ठिकाणी ध्वजारोहण, राष्ट्रगीत व भारतीय संविधान प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले. यामुळे अख्खे गाव देशभक्ती आणि निसर्ग प्रेमाच्या रंगात रंगून गेले होते. स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने मर्यादित गर्दीत ग्रामपंचायत कार्यालय परिसरातून वृक्ष दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. दिंडी ग्रामपंचायत कार्यालयात परतल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागील परिसरात २०० रोपट्यांची लागवड करण्यात आली. यावेळी ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी युवाशक्ती मंचचे संस्थापक अध्यक्ष रोशन शिवणकर यांनी फेटे बांधून त्यांचा सन्मान केला व वृक्षारोपण करवून घेतले. कार्यक्रमाला सरपंच गायत्री इरले, उपसरपंच सुनील राऊत यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी राजू वैश्य, नारायण सावरकर, हेमराज लाडे, कपिल अग्रवाल, शैलेश विठ्ठले व गावातील भजन मंडळांनी सहकार्य केले .

------------------------

९६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला दिला ध्वजारोहणाचा मान

सौंदड येथील ९६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक वासुदेव इरले यांना ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण करण्याची संधी देऊन त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Web Title: And ... the whole village sang the national anthem in unison at the same time