अन् आरक्षण सोडत अखेर निघालीच नाही

By Admin | Updated: July 3, 2015 01:59 IST2015-07-03T01:59:36+5:302015-07-03T01:59:36+5:30

तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत गुरुवारला (२) जाहीर होणार होती.

And we did not leave the reservation at the end | अन् आरक्षण सोडत अखेर निघालीच नाही

अन् आरक्षण सोडत अखेर निघालीच नाही

अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत गुरुवारला (२) जाहीर होणार होती. मात्र तालुका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे ही सोडत रद्द करण्यात आली. शुक्रवारला (३) दुपारी १२ वाजता ही आरक्षण सोडत स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काढण्यात येणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, राज्य निवडणुक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील आठही तालुक्यातील मुदत संपलेल्या १८२ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली. २५ जुलै रोजी होणाऱ्या ग्रा.पं. निवडणुकीसाठी आज (दि.२) सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार होती. तालुक्याच्या ७० ग्रामपंचायतसाठी सन २०१५ ते २०२० या कालावधीकरिता आरक्षण सोडतीचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात काढले जाणार होते. या सोडतीसाठी बाहेर गावावरुन बरेच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच व सदस्य दुपारी १२ वाजेपासून आले होते. नियोजित ठिकाणी तहसीलदार रहांगडाले दुपारी २ वाजता आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह हजर झाले. बराच वेळ त्यांनी नुसती कागदपत्रांची जमवाजमव केली. उपस्थित जनसमूदाय अक्षरश: कंटाळला होता. ३.१५ वाजता अनु.जाती प्रवर्गातील आरक्षित ग्रा.पं.ची नावे घेतली. यावेळी येरंडी या गावाचा एकेरी नामोल्लेख केला. या तालुक्यात एकूण ५ येरंडी नावाची गावे आहेत. कोणती येरंडी हा प्रश्न जनसमुदायाने उपस्थित करताच तहसीलदार भांबावले. त्यांनी पुन्हा कागदपत्राची शहनिशा केली. शेवटी येरंडी/देवलगाव हे गाव घोषित केले. अनु. जाती प्रवर्गातील १२ ग्रामपंचायतीच्या सरपंचाची नावे घोषित केली जाणार होती. मात्र १० नावांवरच तहसीलदार थबकले. वारंवार होणाऱ्या चुकीच्या उद्घोषणेमुळे लोकं चिडले. शेवटी तहसीलदारांनी ही आरक्षण सोडत उद्या (दि.३) दुपारी १२ वाजता घोषित होणार असल्याची उद्घोषणा केली. तालुका प्रशासनाच्या अशा ढिसाळ नियोजनामुळे लोकांचा वेळ वाया गेला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: And we did not leave the reservation at the end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.