अन् क्रिकेटप्रेमींचा झाला हिरमोड
By Admin | Updated: March 27, 2015 00:32 IST2015-03-27T00:32:14+5:302015-03-27T00:32:14+5:30
विश्वचषकात एकामागून एक सलग सात सामने जिंकून समस्त क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा उंचावलेल्या भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी उपांत्यफेरीचा महत्वपूर्ण सामना गमावला.

अन् क्रिकेटप्रेमींचा झाला हिरमोड
गोंदिया : विश्वचषकात एकामागून एक सलग सात सामने जिंकून समस्त क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा उंचावलेल्या भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी उपांत्यफेरीचा महत्वपूर्ण सामना गमावला. चार वर्षापूर्वी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावर आॅस्ट्रेलियाने सहज मिळविलेला हा विजय गोंदियाकर क्रिकेटप्रेमींच्या चांगचा जिव्हारी लागला.
अशा पद्धतीने निराशाजनक पराभवाने स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्याने गोंदियातील क्रिकेटप्रेमींची घोर निराशा झाला. यासोबतच क्रिकेटवर सट्टा आणि स्पर्धा लावणाऱ्यांचेही अंदाज पार चुकले.
गुरुवार हा कार्यालयीन कामकाजाचा दिवस असला तरी शासकीय कर्मचाऱ्यांपासून तर व्यापारी आणि विद्यार्थी वर्गाचेही लक्ष या सामन्याकडे लागले होते. त्यासाठी सकाळपासूनच अनेक जण टिव्हीसमोर बसले होते. काही शासकीय कर्मचाऱ्यांनी तर टीव्हीवर क्रिेकेट सामना पाहता यावा म्हणून खास सुटीच घेऊन टाकली होती. तर महाविद्यालयीन तरुणांनी एका ठिकाणी जमून क्रिकेट पाहण्याची योजना आखली होती. भारत जिंकल्यानंतर विजयाचा जल्लोष कसा साजरा करायचा याचेही प्लॅनिंग अनेकांनी केले होते. पण सर्वांच्या अपेक्षा आणि आशांवर पाणी फेरल्या गेले.
भारतीय संघच सामना जिंकणार असा विश्वास असणाऱ्या अनेकांनी पैजा (शर्यती) लावल्या. सट्टाबाजारही दिवसभर गरम होता. आॅस्ट्रेलियन संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच भारतीय संघाला पहिला झटका बसला. त्यातच तगडी फलंदाजी करीत उभारलेला धावांचा डोंगर ३०० पेक्षा पार केला तेव्हा क्रिकेटप्रेमींच्या चेहऱ्यावरील भाव बदलले होते. एवढे आव्हान आपला संघ पेलू शकणार का, अशी चिंता वाटत होती. अनेकांनी आशा सोडली नव्हती. मात्र सामना पुढे-पुढे सरकत असताना जिंकण्याची आशाही मावळत गेली. (जिल्हा प्रतिनिधी)