गोंडी संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेची चमू
By Admin | Updated: May 19, 2014 23:41 IST2014-05-19T23:41:03+5:302014-05-19T23:41:03+5:30
भारतीय संस्कृतीतील विविध पैलूंचा, त्यातल्या त्यात मध्य भारतातील गोंडी आदिवासी संस्कृतीचा सखोल अभ्यास करून त्यावर डॉक्युमेटरी फिल्म आणि पुस्तक तयार

गोंडी संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेची चमू
गोंदिया जिल्ह्यात संस्कृतीचे निरीक्षण : एका आठवड्यात पाच राज्यांचा दौरा
सालेकसा : भारतीय संस्कृतीतील विविध पैलूंचा, त्यातल्या त्यात मध्य भारतातील गोंडी आदिवासी संस्कृतीचा सखोल अभ्यास करून त्यावर डॉक्युमेटरी फिल्म आणि पुस्तक तयार करण्यासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध टी.व्ही. चॅनल ‘नॅशनल जिओग्राफी’चे दोन पत्रकार गोंदिया जिल्ह्यात वास्तव्यास आले आहेत. मोठ्या उत्साहाने व जिज्ञासू वृत्तीने ते विविध बाबीवर अभ्यास करीत आहेत. आदिवासी क्षेत्राच्या प्रत्येक कार्यशैलीची शूटिंग ते करीत आहेत. अमेरिकेच्या वॉशिंग्टनवरून आलेल्या नॅशनल जियोग्राफी चॅनलचे पत्रकार व कॅमरामेन स्पेंसर निल्सम व त्याची पत्नी हे दोघे या चॅनलसाठी काम करीत असून ते १४ मे पासून २० मे २०१४ पर्यत मध्यभारतात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसड, ओरीसा आणि आंध्रप्रदेश या पाच राज्याचा दौरा करीत आहेत. दरम्यान पाचही राज्यात आदिवासी गोंड समाजाची परिस्थिती, त्यांचा विकास, त्यांच्यात झालेली जागृती त्यांच राहणीमान, पूर्वीपेक्षा आताच्या राहणीमानात झालेली सुधारणा, यासाठी शासन व स्वयंसेवी संघटनांनी केलेली कामे, त्याच्या लोकांना मिळणारा प्रत्येक लाभ याबाबत सचित्र माहिती तयार करीत आहेत. सालेकसा येथे उईके शिल्प ग्राम येथे त्यांनी आपल्या मोहिमची सुरूवात केली. शिल्पकार मनोहर उईके आणि भोपाळ येथील सी.जी. नेटवर्कच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने सालेकसा येथे सतत दोन दिवस विविध रंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यात आदिवासी संगीत, वाद्य, गीत, नृत्य, नाटक, वेशभूषा, लोकभाषा, मायबोली, बाहुल्यांचा खेळ, गोंडी समाजात आलेली जागृती मागासलेले असल्याची कारणे इत्यादीचे दर्शन घडविण्यात आले. तसेच आदिवासी लोकांच्या अंगी असलेले विविध कलात्मक गुण यांचा परिचय सादर करण्यात आला. या सगळ्या बाबींचा अभ्यास व शुटींग करताना त्या पत्रकारांना अनेक बाबतीत नवल वाटले, असे मत त्यांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केले. भारतात आल्यावर आपली जिज्ञासा वाढल्याचेही त्यांनी सांगीतले. दरम्यान ते दोन्ही पत्रकार इंग्रजी भाषेतच बोलत असल्यामुळे येथील स्थानिक आदिवासी गोंड समाजातील लोकांना त्यांच्याशी संवाद साधण्यात अडचण ही गेली. परंतु त्यांनी आपली जिज्ञासा कमी होऊ दिली नाही. पाच राज्यातील आदिवासी समाज त्यात गोंड समाज व त्यांची जीवनशैली, त्यांचे भोजन, भोजनाची वैशिष्ट्ये, भोजन तयार करण्याची पध्दत, जेवणावळी बसण्याची पध्दत, त्यांचे वस्त्र घालण्याची पध्दत, निवास, निवास डिजाईन, प्रवेशव्दार तसेच गावात एकमेकांशी संबंध, सलोखा, उत्सव साजरा करण्याची पध्दत, ग्रामीण भागातील बाजारपेठ, आठवडी बाजार व बाजाराची खास वैशिष्ट्ये यासह विविध पैलूंवर चित्रफिती तयार करणार आहेत. त्याचबरोबर आदिवासी समाजातील लोकांची जीवनशैली व इतर समाजाकडून विकासात योगदान याबबत माहिती घेण्यात येत आहे. (प्रतिनिधी)