आंबेडकर चौकाची शान गमावली
By Admin | Updated: June 11, 2014 00:06 IST2014-06-11T00:06:04+5:302014-06-11T00:06:04+5:30
गोंदिया शहरातील बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाण पूल आता लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असताना या पुलाच्या दक्षिण टोकावरील आंबेडकर चौकातील पूर्व-पश्चिम मार्गच बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या चौकाची

आंबेडकर चौकाची शान गमावली
नियोजनशून्यता : उड्डाण पुलामुळे पुतळ्याचेही अस्तित्व धोक्यात, विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल
गोंदिया : गोंदिया शहरातील बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाण पूल आता लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असताना या पुलाच्या दक्षिण टोकावरील आंबेडकर चौकातील पूर्व-पश्चिम मार्गच बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या चौकाची शानच लयास गेली आहे. या मार्गाने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांनाही आता मोठा फेरा घेऊन जावे लागत आहे. मार्ग बंद करण्याच्या निर्णयामुळे हा उड्डाण पूल गोंदियावासीयांच्या सोयीचा होण्याऐवजी गैरसोयीचाच ठरणार असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
गेल्या पाच वर्षांपासून बांधकाम सुरू असलेल्या या उड्डाण पुलाचे काम अखेर पूर्ण झाले. वाहनांची वाढलेली संख्या पाहता जुन्या रेल्वे उड्डाण पुलावर होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी आता या नवीन पुलाचे लोकार्पण केव्हा होणार याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. परंतू पुलावरून वाहतूक सुरू केल्यानंतर आंबेडकर चौकाकडील बाजूने पुलावरून उतरणारी वाहने वेगात येणार असल्यामुळे चौकात अपघात होऊ नये यासाठी रस्ता सुरक्षा समितीने काही उपाययोजना सुचविल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तूर्त तहसील कार्यालयाकडून मारवाडी शाळेकडे जाणाऱ्या रस्ता आंबेडकर चौकात आडवे रस्ता दुभाजक टाकून बंद करण्यात आला आहे. परंतु अशा पद्धतीने रस्ता बंद करणे कितपत संयुक्तिक ठरेल याबाबत नागरिकांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
चौकातील रस्ता बंद केल्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे जायचे असल्यास आंबेडकर चौकातून १३० मीटरवर असलेल्या नेहरू चौकात जाऊन फेरा घेत जावे लागत आहे. तसेच तहसीलकडून पश्चिमेकडील मारवाडी शाळेकडे जायचे असल्यास १२० मीटर लांब असलेल्या जयस्तंभ चौकात जाऊन पुन्हा आंबेडकर चौकात यावे लागत आहे.
हा त्रास कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीने पुनर्आढावा घेणे गरजेचे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)