आमगाव तालुका वार्तापत्र-वाचविण्यासाठी दबावतंत्र नको

By Admin | Updated: May 9, 2014 03:16 IST2014-05-09T03:16:08+5:302014-05-09T03:16:08+5:30

अलिकडे आमगाव पंचायत समितीमध्ये पंचायत समिती सदस्याला किंवा महिला सदस्याच्या पतीला वाचविण्यासाठी जो राजकिय दबावतंत्राचा उपयोग केला जात आहे

Amagaon Taluka Newspaper - It does not constraint to save | आमगाव तालुका वार्तापत्र-वाचविण्यासाठी दबावतंत्र नको

आमगाव तालुका वार्तापत्र-वाचविण्यासाठी दबावतंत्र नको

 ओ.बी.डोंगरवार■ आमगाव
अलिकडे आमगाव पंचायत समितीमध्ये पंचायत समिती सदस्याला किंवा महिला सदस्याच्या पतीला वाचविण्यासाठी जो राजकिय दबावतंत्राचा उपयोग केला जात आहे तो सध्या येथे चर्चेचा विषय आहे. त्यासाठी आपली ताकत पणाला लावली जात आहे. याची कुणकुण कानावर आल्याने यात जे काही सुरु आहे ते योग्य की अयोग्य याचा विचार सत्तारुढ पंचायत समिती सदस्यांनी करणे आवश्यक आहे. अन्यथा पुढे येणार्‍या पंचायत समिती निवडणुकीत याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आमगाव पंचायत समितीमध्ये एका पक्षाची सत्ता अनेक वर्र्षांपासून आहे. त्यामुळे बहुमताच्या आधारे 'मेरे मुर्गी की एक ही टांग' असा विचार कार्यरत पं.स. सदस्यांनी करायला नको. एका पंचायत समिती सदस्याच्या पतीवर जर खंडविकास अधिकार्‍यांनी थोडी कारवाही केली तर त्याच्यावर खूप रोष, नाराजी वगैरे व्यक्त करण्यात आली. मासिक सभेच्या बैठकीत हे चित्र समोर आले. मात्र कारवाई झाली ती योग्यच होती, असेही मत काही सत्तारुढ गटातील पं.स. सदस्यांनी व्यक्त केले. मात्र काहींनी झालेली कारवाई मागे घ्या, असा आग्रह केला आहे.
कामचुकारपणा करणार्‍या कर्मचार्‍यावर जर अधिकार्‍यांनी कारवाई केली तर नवल काही नाही. ज्याच्यावर कारवाई झाली त्या पं.स.सदस्याच्या पतीचे शाळेला बुट्टी मारणे, केव्हाही काम सांगुन पं.स. मध्ये येणे ही नित्याची बाब झाली होती. मात्र त्यांच्यावर खंडविकास अधिकार्‍यांनी कारवाही केली तर वाईट वाटण्यासारखे काही नाही. असे असताना मासिक बैठकीत त्यांच्यावरील कारवाई मागे घ्या, असे म्हणून हंगामा करणे कितपत योग्य आहे, ते सदस्यांनी ठरवावे. आता याच पं.स. सदस्याचे एक पाऊल पुढे झाल्याने चक्क त्यांच्या वॉर्डातही रोष व्यक्त केला गेला.
पंचायत समिती सदस्याला जिल्हा परिषदेकडून विकासात्मक कामांसाठी फंड मिळतो. त्याचा उपयोग तालुक्यात कुठेही करता येतो, यात काही दुमत नाही. मात्र मिळालेला फंड किंवा अनुदानाची दुसरी बाजू समजून घेणे तेवढेच महत्वाचे आहे. जर पंचायत समिती सदस्याला मिळालेला फंड स्वत:चा स्वार्थ ठेऊन किंवा स्वत:च्या फायद्याकरिता जर कुणी उपयोगात आणत आहे, असे निदर्शनास आले तर त्या सदस्यत्वावर नियमानुसार कावाई झालीच पाहीजे. हेच कारण नाली बांधकामात झाले. बांधकाम केले त्यावर वॉर्डातील नागरिकांचा रोष नाही, मात्र मी निधी आणला आहे. आपल्या मर्जीप्रमाणे काम होईल, कोणाला बोलण्याचा अधिकार नाही असे शब्द योग्य वाटत नाही. त्यामुळे शेवटी नाली बांधकाम बंद पडले. तात्पर्य हेच की, सत्ता हातात आहे म्हणून स्वत:चे हित जोपासून कामे करण्याऐवजी लोकांच्या फायद्याला प्राधान्य द्यावे.

Web Title: Amagaon Taluka Newspaper - It does not constraint to save

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.