सर्व पर्यटनस्थळं अजूनही ‘क’ वर्ग श्रेणीतच

By Admin | Updated: November 6, 2014 01:56 IST2014-11-06T01:56:15+5:302014-11-06T01:56:15+5:30

निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यात वनभ्रमंतीसाठी राज्यातूनच नाही तर देशभरातून हौशी पर्यटक वर्षभर येत असतात.

All the tourist destinations are still in category 'A' category | सर्व पर्यटनस्थळं अजूनही ‘क’ वर्ग श्रेणीतच

सर्व पर्यटनस्थळं अजूनही ‘क’ वर्ग श्रेणीतच

मनोज ताजने गोंदिया
निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यात वनभ्रमंतीसाठी राज्यातूनच नाही तर देशभरातून हौशी पर्यटक वर्षभर येत असतात. मात्र नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि आता व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आलेल्या या जिल्ह्यातील ही स्थळं अजूनही चक्क ‘क’ वर्ग पर्यटनाच्या श्रेणीत आहेत. हा पर्यटन विभागाचा दुर्लक्षितपणा की लोकप्रतिनिधींची उदासीनता, असा प्रश्न निर्माण होत आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय किर्तीच्या ठिकाणांना ‘अ’ वर्ग पर्यटनश्रेणीत टाकले जाते. या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी, तेथील विविध सोयीसुविधांसाठी केंद्र शासनाकडून तसेच परराष्ट्राकडूनही निधी मिळतो. राज्य स्तरावरील महत्वाच्या पर्यटनस्थळांना ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा दिला जातो. त्यासाठी राज्य शासनाकडून निधी दिला जातो. तर ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाच्या विकासाकरिता जिल्हा नियोजन व विकास समितीकडून निधी दिला जातो. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समिती कोणत्या स्थळाला ‘क’ वर्ग पर्यटनश्रेणीत टाकायचे याचा निर्णय घेते.
जिल्ह्यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य या पर्यटनस्थळांना अनेक वर्षांपासून संपूर्ण देशभरातून हजारो वनपर्यटक, पक्षीप्रेमी भेट देतात. आता नागझिरा-नवेगाव मिळून व्याघ्र प्रकल्प तयार झाला आहे. देशातील मोजक्या व्याघ्र प्रकल्पांपैकी हा एक व्याघ्र प्रकल्प आहे. वास्तविक हे पर्यटनस्थळ ‘अ’ वर्ग श्रेणीत असणे गरजेचे होते. मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळे या बाबीकडे अजूनपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने लक्ष दिलेले नाही.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही या महत्वपूर्ण विषयाला कधी हात का घातला नाही, ही आश्चर्याची बाब ठरत आहे. याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता जिल्हा पर्यटन विकास समितीकडे जिल्ह्यातील कोणतेही पर्यटनस्थळ अ किंवा ब वर्ग श्रेणीत असल्याची माहिती नाही. एमटीडीसी (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ)च्या नागपूर कार्यालयातही याबाबत चौकशी केली असता गोंदिया किंवा भंडारा जिल्ह्यात कोणतेही पर्यटनस्थळ अ आणि ब वर्ग श्रेणीत नसल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली.
वास्तविक नवेगाव राष्ट्रीय उद्यान परिसरातील जलाशय थंडीच्या दिवसात पक्षी निरीक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्र असते. हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेले विदेशी पक्षी तेथे जलविहार करताना दिसतात. पण तेथे येणाऱ्या पर्यटकांची कोणतीही सोय होत नसल्यामुळे त्यांना निराश होऊ जावे लागते. देश पातळीवरील हे पर्यटनस्थळ ‘अ’ किंवा ‘ब’ वर्ग श्रेणीत असते तर केंद्र आणि राज्य शासनाचा भरपूर निधी येथे येऊन या ठिकाणी विविध प्रकारच्या सोयीसुविधा निर्माण करणे शक्य झाले असते. यातून पर्यटकांची संख्या वाढून जिल्ह्यात रोजगाराच्या संधी अनेकांना मिळाल्या असत्या. परंतू जिल्हावासीयांच्या दुर्दैवाने तसे अद्याप झाले नाही.
केवळ नवेगाव-नागझिराच नाही तर प्रतापगड, हाजरा फॉल, कचारगडची गुहा, मांडोदेवी, ढासगड, इटियाडोह जलाशय अशी पर्यटकांना आकर्षित करू शकणारी अनेक स्थळं जिल्ह्यात असताना त्यांच्या विकासाकडे अजूनही गांभिर्याने लक्ष दिल्या गेले नाही. त्यामुळे ही स्थळं अनेक वर्षांपासून केवळ जिल्हास्तरावरील ‘क’ वर्ग श्रेणीपुरती मर्यादित राहिली आहेत.

Web Title: All the tourist destinations are still in category 'A' category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.