कोविड सेंटरसाठी तिन्ही कलार समाज भवन उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:29 IST2021-04-21T04:29:03+5:302021-04-21T04:29:03+5:30
गोंदिया : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून दररोज ५०० ते ६०० बाधितांची नोंद केली जात ...

कोविड सेंटरसाठी तिन्ही कलार समाज भवन उपलब्ध
गोंदिया : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून दररोज ५०० ते ६०० बाधितांची नोंद केली जात आहे. यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागावर फार ताण पडत आहे. या समस्याला समोरे जाण्यासाठी गोंदिया कलार समाजाने अग्रणी भूमिका घेत समाजाचे तिन्ही कलार समाज भवन कोविड केअर सेंटरसाठी नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार, अशी माहिती अखिल भारतीय कलार समाजाचे अध्यक्ष मुकेश शिवहरे, एल. यू. खोब्रागडे, प्रमोद कटकवार, मनिष चौरागडे, दीपक रामदेव जायस्वाल आदी समाजबांधवांनी दिली.
राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली असल्याने मोठ्या प्रमाणात बाधितांची नोंद होत आहे. यामुळे रुग्णांना रुग्णालयात बेड व्यवस्था होत नसल्याने कलार समाजाच्या वतीने आपले तिन्ही समाज भवन कोविड केअर सेंटरसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गणेशनगर, पिंडकेपार, बाजपेई चौक येथील या समाज भवनाचा समावेश आहे. यासंदर्भात अखिल भारतीय कलार समाजाचे अध्यक्ष मुकेश शिवहरे यांनी जिल्हाधिकारी दीपककुमार मीना, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना माहिती दिली. यावर जिल्हाधिकारी यांनी कलार समाजाचे आभार मानत आवश्यकता असल्यास या समाज भवनाचा उपयोग करण्यात येणार असे सांगितले. दरम्यान, शिवहरे यांनी या कोरोनाकाळात आपण सर्वांना रुग्णांच्या योग्य सुविधेसाठी प्रशासनाच्या मदतीसाठी समोर आले पाहिजे, असे मत व्यक्त केले.