जिल्ह्यात सर्वदूर पाऊस - शेतकऱ्यांना दिलासा : कर्मचाऱ्यांची मात्र तारांबळ
By Admin | Updated: June 21, 2014 01:48 IST2014-06-21T01:48:35+5:302014-06-21T01:48:35+5:30
ज्या पावसाची सर्वांना प्रतीक्षा होती तो पाऊस आज अखेरीस बरसला.

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस - शेतकऱ्यांना दिलासा : कर्मचाऱ्यांची मात्र तारांबळ
गोंदिया : ज्या पावसाची सर्वांना प्रतीक्षा होती तो पाऊस आज अखेरीस बरसला. काही भागात दुपारपासून तर काही भागात सायंकाळी जोरदार हजेरी लावून पावसाने सर्वांना तृप्त केले.
सकाळी आकाश निरभ्र असल्याने चकचकीत ऊन पडले होते. मात्र सूर्य माथ्यावर येऊन कलाटणीला लागला तसे आकाशात हळूहळू ढगाळ वातावरण तयार झाले. सायंकाळी ४ वाजता काळ्या ढगांनी आकाश व्यापून गेले. सर्वदूर पसरलेल्या या ढगांमधून काही वेळातच पाऊस बरसण्यास सुरूवात झाली. सोबत ढगांचा गडगडाट आणि अधूनमधून चमकणाऱ्या विजांचा कडकडाट जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्याची जाणीव करून देत होता.
मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा करीत खरीप हंगामाची पूर्ण तयारी केलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने चांगलाच दिलासा दिला. मात्र ५ वाजताच घराची ओढ लागणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांची या पावसाने चांगलीच तारांबळ उडविली. पावसाचे कोणतेही लक्षण नसताना सकाळी बिनधास्तपणे कार्यालयांमध्ये येणाऱ्यांना सायंकाळी मात्र पाऊस थांबण्याची वाट पाहात ताटकळत राहावे लागले.
अखेर ६ वाजताच्या सुमारास पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानंतर त्यांना घराची वाट धरावी लागली. पण खट्याळ पावसाने त्यांना चिंब केल्याशिवाय सोडले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)