लॉकडाऊनच्या काळात बंद असलेल्या सर्वच बसेच रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:25 IST2021-02-08T04:25:53+5:302021-02-08T04:25:53+5:30
गोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर सर्वच वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून ...

लॉकडाऊनच्या काळात बंद असलेल्या सर्वच बसेच रस्त्यावर
गोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर सर्वच वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून बसफेऱ्यासुध्दा बंद केल्या होत्या. परिणामी, याचा फटका गोंदिया आणि तिरोडा या दोन्ही आगाराला बसला होता. मात्र, कोरोनानंतर आता सर्वत्र परिस्थिती पूर्वपदावर येत असून रेल्वे आणि बसेससुध्दा हळूहळू मार्गावर येत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात बसफेऱ्या बंद होत्या. मात्र, आता जिल्ह्यातील गोंदिया आणि तिरोडा या दोन्ही आगारांच्या एकूण ५४२ बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे या दोन्ही आगारांना उत्पन्न वाढविण्यास मदत होत असून प्रवाशांनासुध्दा त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचण्यास मदत होत आहे. ज्या मार्गावर प्रवाशांची संख्या आहे, त्या मार्गावर सर्वच बसेस असून प्रवाशांचा प्रतिसाद नसलेले काही मोजके मार्ग वगळल्यास सर्वच ठिकाणी एसटी पोहोचत आहे. मात्र, आजघडीला हाल्टींग बसेस बंद आहेत. मात्र त्यासुध्दा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे आगार व्यवस्थापकांनी सांगितले आहे. ग्रामीण भागात प्रवाशांना प्रवासाचे सोयीचे साधन हे एसटीच आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी ती एकप्रकारची जीवनदायीनीच आहे. लॉकडाऊनच्या काळात तीन ते चार महिने बसेस बंद असल्याने प्रवाशांचे हाल झाले होते. मात्र, आता बसेस पूर्ववत सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
.......
सर्वच मार्गावर बसेस धावत असल्याने अडचण दूर
जिल्ह्यातील सर्वच मार्गावर सध्या एसटीच्या बसफेऱ्या नियमित सुरू आहे. सर्वाधिक प्रवासी असलेले गोंदिया-देवरी, गोंदिया तिरोडा, गोंदिया- अर्जुनी मोरगाव, गोंदिया-आमगाव, गोंदिया-बालाघाट, गोंदिया- नागपूर या सर्वच मार्गावर आता प्रवाशांच्या सोयीच्या वेळेत बसेस उपलब्ध असल्याने त्यांची अडचण दूर झाली आहे.
.......
दोन्ही आगाराची गाडी रुळावर
लॉकडाऊनच्या काळात बसेस पूर्णपणे बंद असल्याने गोंदिया आणि तिरोडा आगारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.आता गोंदिया आगाराला ७ लाख तर तिरोडा आगाराला ४ लाख रुपयांचे उत्पन्न दररोज मिळत आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतर या दोन्ही आगारांची गाडी रुळावर आल्याचे दिलासादायक चित्र आहे.
.......
कोट
रावणवाडी कामठामार्गे आमगावला जाणारी सकाळी ७ वाजता बस नसल्याने भाजीपाला, दूधविक्रेते व प्रवाशांना थोडा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गावर सकाळी बस सुरू केल्यास प्रवाशांना मदत होईल.
- सुरदीप कावळे, रावणवाडी
.......
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाराभाटी मार्गावर फार कमी बसेस सध्या सुरू असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गावर बसेसची संख्या वाढविल्यास प्रवाशांची अडचण दूर होवू शकते.
-रामदास लोणकर,
......
लॉकडाऊननंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्याने जिल्ह्यातील सर्वच मार्गांवर बसफेऱ्या पूर्ववत सुरू केल्या आहेत. काही मोजक्या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने काही बसेस बंद आहेत, पण इतर सर्वच मार्गावर नियमित बसफेऱ्या सुरू आहेत.
- संजना पटले, आगार व्यवस्थापक गोंदिया
..........
जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या बसफेऱ्या
गोंदिया आगार : ३३०
तिरोडा आगार :२१२
..........................