Airline service again pending at Gondia | गोंदियातून विमानसेवा पुन्हा लांबणीवर
गोंदियातून विमानसेवा पुन्हा लांबणीवर

ठळक मुद्देविमान कंपन्यामध्ये अनुउत्सुकतानव्याने राबविणार प्रक्रिया, प्राधिकरण आशावादी

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळावरुन विमानसेवा सुरू करण्यासाठी शासन आणि विमानतळ प्राधिकरणाचे वर्षभरापूर्वी सुरूवात केली होती. मात्र विमानसेवा सुरू करण्यासाठी विमानसेवा देणाऱ्या कंपन्यानी उत्सुकता दाखविली नाही. परिणामी मागील वर्षीपासून विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव लांबणीवर गेला आहे. मात्र विमानतळ प्राधिकरण अजूनही आशादायी असून लवकरच विमानसेवा सुरू होईल असे सांगत आहे.
तत्कालीन केंद्रीय विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने बिरसी येथे आतंरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ तयार करण्यात आले. मात्र आठ ते दहा वर्षांचा कालावधी लोटूनही या विमानतळावरुन वाणिज्य विमानसेवा सुरू करण्यात आली नव्हती. मंत्री आणि काही विशिष्ट व्यक्ती यांचीच विमाने विमानतळावर येत होती. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात या विमानतळावरुन वाणिज्य विमानसेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. मुंबई, कलकत्ता, पुणे अशी विमानसेवा सुरू करण्यात येणार होती. यामुळे जिल्हावासीयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. गोंदिया ही व्यापार नगरी असून या ठिकाणी कपडा आणि तांदळाची मोठी बाजारपेठ आहे. गोंदिया जिल्ह्यातील तांदळाची देशात आणि देशात आणि देशाबाहेर सुध्दा निणर्यात केली जाते. तर जिल्ह्यातील कपडा व्यापारी कलकत्ता, मुंबई येथे खरेदीसाठी जातात. शिवाय मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा जिल्ह्याला लागून आहे. गोंदिया येथे रेल्वे जक्शंन असल्यामुळे बिरसी विमानतळावरुन विमानसेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने सुध्दा सोयीचे होणार होते. हीच बाब लक्षात घेत काही नामाकिंत हॉटेल्स कंपन्यानी गोंदिया येथे हॉटेल देखील सुरू केले आहेत. यामुळे स्थानिक व्यापाराला सुध्दा चालना मिळणार होती. मात्र मागील वर्षभरापासून यात कुठल्याच हालचाली झाल्या नसल्याचे चित्र आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व शहर आणि जिल्ह्यांना विमानसेवेने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या रिजनल कनेक्टविटी स्किम अंतर्गत (आर.सी.सी) कोल्हापूर, नांदेड, जळगाव येथून वाणिज्य विमानसेवेला सुरूवात करण्यात आली.या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात गोंदियासह इतर जिल्ह्यांचा समावेश आला होता. मात्र दुसऱ्या टप्प्यात गोंदिया विमानतळावरुन विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्यानी फारशी उत्सुकता दाखविली नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात विमानसेवा सुरू करता आली नसल्याची माहिती आहे. आता तिसऱ्या टप्प्यात पुन्हा गोंदियाचा समावेश करण्यात आला असून विमानसेवा सुरू होण्याची आशा येथील विमानतळ प्राधिकरणाला आहे.
विशेष म्हणजे बिरसी येथील विमानतळावर प्रवाशी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध आहे. शिवाय प्रवाशी विमान वाहतूक सेवा सुरू झाल्यास परिसरातील उद्योग धंद्यांना सुध्दा चालना मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. दरम्यान राज्य सरकारकडून आवश्यक कारवाही पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन चार महिन्यात प्रवाशी विमान वाहतूक सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.त्यासाठी आवश्यक सोयी सुविधा व जमिनीचे संपादन करण्यास विमानतळ प्राधिकरणाने सुरूवात केली आहे.

राजकीय पाठबळाची गरज
गोंदिया येथून विमानसेवा सुरू करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणातर्फे प्रयत्न केले जात आहे. दुसऱ्याच टप्प्यात विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र काही अडचणीमुळे ते शक्य झाले नाही.त्यामुळे आता तिसऱ्या टप्प्यात पुन्हा प्रयत्न केले जात आहे. विमानसेवा सुरू करण्यासाठी स्थानिकांचा पुढाकार आणि राजकीय पाठबळाची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे लोकप्रतिनिधीनी यासाठी पुढाकार घेतला विमानसेवा सुरू होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते.

विमानतळाचा चारशे एकरवर विस्तार
तत्कालीन विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने बिरसी येथे चारशे एकरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात आले. त्यामुळेच बिरसी येथील विमानतळावर पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. मागील आठ वर्षांच्या कालावधीत या प्रशिक्षण केंद्रातून अनेक चांगले पायलट तयार झाले आहेत. बिरसी विमानतळावरील उपलब्ध सोयी सुविधा लक्षात घेऊन या विमानतळाचा कार्गो हब म्हणून देखील विचार केला जात होता.

सर्व जिल्हे व शहरांना विमानसेवेने जोडण्याचे शासनाचे धोरण आहे. त्याचसाठी आर.सी.सी.अंतर्गत विमानतळावरुन वाणिज्य सेवेला सुरूवात केली जात आहे. यात गोंदियाचा सुध्दा समावेश आहे. आता तिसऱ्या टप्प्यात पुन्हा येथील विमानतळावरुन विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रक्रिया राबविली जात आहे. लवकरच त्याला यश येईल.
- सचिन खंगार, बिरसी विमानतळ संचालक.

 

 

 

 

 

Web Title: Airline service again pending at Gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.