तेंदूपाने संकलनातून १२.७८ कोटींचे उद्दिष्ट
By Admin | Updated: May 13, 2016 01:45 IST2016-05-13T01:45:59+5:302016-05-13T01:45:59+5:30
सन २०१६ मध्ये गोंदिया वन विभागातील संपूर्ण १२ परिक्षेत्रातील २९ तेंदूपानांच्या घटकांसाठी शासनाद्वारे परवानाधारकांची नियुक्ती करण्यात आली.

तेंदूपाने संकलनातून १२.७८ कोटींचे उद्दिष्ट
४१.६२ टक्के काम पूर्ण : ४० हजार मजुरांच्या हातांना काम
गोंदिया : सन २०१६ मध्ये गोंदिया वन विभागातील संपूर्ण १२ परिक्षेत्रातील २९ तेंदूपानांच्या घटकांसाठी शासनाद्वारे परवानाधारकांची नियुक्ती करण्यात आली. या हंगामात तेंदूपाने संकलनाचे काम सुरळीतपणे केले जात आहे. यावर्षीच्या हंगामासाठी ४३ हजार ७९० प्रमाण गोणींचे उद्दिष्ट असून ही उद्दिष्टपूर्ती झाल्यास शासनाला १२.७८ कोटी रूपयांचा महसूल प्राप्त होणार आहे.
सन २०१६ च्या हंगामात तेंदूपाने संकलनाचे काम गोंदिया विभागातील क्षेत्रीय कर्मचारी व परवानाधारक यांनी त्यांच्या स्तरावर केलेल्या उत्तम नियोजनामुळे उत्कृष्टपणे होत आहे. या वर्षात गोंदिया वन विभागासाठी नेमून दिलेल्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत ४१.६२ टक्के (१८ हजार २२४ प्रमाण गोणी) तेंदूपानांचे संकलन झाले आहे. तेंदूपाने संकलन कामामुळे जवळपास ४० हजार मजुरांना उन्हाळ्याच्या कालावधीत रोजगार प्राप्त झालेला आहे.
सदर हंगाम २५ एप्रिलपासून सुरू करण्याचे आदेश निघाले होते. मात्र अनेक बिटमध्ये प्रत्यक्ष ३० एप्रिल व २ मेपासून तेंदूपाने तोडणीला सुरूवात झाली. हा हंगात ५ जूनपर्यंत सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. जिल्ह्यात तेंदूपाने संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात होते. तेंदूपाने संकलन करणाऱ्या मजुरांच्या कामावर गदा येवू नये यासाठी शासनसुद्धा प्रयत्नशील असते. जंगलात वनवा लागू नये, तेंदूपाने नष्ट होवू नये यासाठी वन विभागाकडून जनजागृती अभियान राबविण्यात येते. गोंदिया, गोरेगाव, सालेकसा, तिरोडा, कोसमतोंडी, सडक-अर्जुनी, कोहमारा, सौंदड, शेरपार, देवरी, भागी-मुल्ला, नवेगावबांध, अर्जुनी-मोरगाव, चिचगड अशा एकूण २९ बिटमध्ये तेंदूपत्ता संकलनाची कामे सुरू आहेत.
तेंदूपाने संकलन करणे, पुडे सुकविणे, पाणी शिंपणे, बोद भराई करणे आदी संपूर्ण कामासाठी मजुरांना परवानाधारकांच्यामार्फत मजुरी वितरित करण्यात येते. त्यामुळे मजूर कुटुंबांना उन्हाळ्यात एक मोठा आर्थिक आधार प्राप्त झालेला आहे. तेंदूपाने घटक विक्रीपासून मिळालेल्या महसुलातून शासकीय खर्च वजा करून शासनातर्फे मजुरांना शिल्लक रक्कम बोनस स्वरूपात वितरित करण्याचे धोरण आहे.
सन २०१४ मधील काहींचे व सन २०१५ या दोन वर्षांचे बोनस वितरण होणे बाकी आहे. बोनस वितरणाची पूर्वप्रक्रिया सध्या सुरू आहे. काही मजुरांचा मृत्यू झाला तर काही मजुरांची बँकेत खाती नसल्यामुळे त्यांचे बोनस बाकी असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. मजुरांनी आपल्या नावे बँक खाते उघडावे व त्याबाबत माहिती परिक्षेत्र कार्यालयात द्यावी, असे आवाहन गोंदिया वन विभागातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
मागील वर्षी ८८ टक्केच उद्दिष्टपूर्ती
तेंदूपत्ता संकलनासाठी मागील वर्षाच्या हंगामात ४६ हजार प्रमाण गोणींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र त्या हंगामात ४० हजार ९३६ प्रमाण गोणी झाल्याने ८८ टक्केच उद्दिष्टपूर्ती झाली होती. त्याद्वारे शासनाला ९ कोटी २३ लाख ३६ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी तेंदूपाने संकलनापेक्षा मजुरांनी रोजगार हमीच्या कामांना अधिक पसंती दिल्याचे दिसते. तसेच हंगाम संपण्यासाठी आता चार आठवड्यांचा कालावधी बाकी आहे. अशात १२.७८ कोटींची उद्दिष्टपूर्ती होणार किंवा नाही, हे सांगणे मात्र कठीम आहे.