वन पर्यटनासोबत कृषी पर्यटनही शक्य अनेकांना आशा

By Admin | Updated: May 8, 2014 23:49 IST2014-05-08T23:49:51+5:302014-05-08T23:49:51+5:30

जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामुळे वन्यप्रेमींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यातून जिल्ह्याकडे पुन्हा एकदा पर्यटकांची पावले वळू शकतात.

Agricultural tourism with forest tourism also many people hope for possible | वन पर्यटनासोबत कृषी पर्यटनही शक्य अनेकांना आशा

वन पर्यटनासोबत कृषी पर्यटनही शक्य अनेकांना आशा

नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे बदलू शकते जिल्हावासीयांचे जीवनमान

मनोज ताजने - गोंदिया

जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामुळे वन्यप्रेमींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यातून जिल्ह्याकडे पुन्हा एकदा पर्यटकांची पावले वळू शकतात. मात्र वनपर्यटनासोबतच या भागात कृषी पर्यटनाला चालना दिल्यास पर्यटकांसाठी हे वेगळे आकर्षण राहणार आहे. यातूनच जिल्ह्यात रोजगाराची नवी दालनं उघडल्या जाऊन स्वयंरोजगाराला चालना मिळू शकते, असा दावा अनेक जाणकार करीत आहेत. नवेगावबांध येथे पर्यटन विकास कामांच्या नावाखाली सुरू असलेल्या खेळखंडोब्यावर लोकमतने चार भागांची मालिका प्रकाशित केल्यानंतर अनेकांनी ‘लोकमत’ला फोन करून या विषयावर प्रकाश टाकल्याबद्दल धन्यवाद दिले.

आतातरी जिल्हा पर्यटन समितीची या बाबतीत असलेली उदासीनता दूर होऊन येथील अर्धवट असलेल्या कामांना चालना मिळेल अशी आशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. सोबतच या भागात पर्यटनाला चालना देण्यासाठी कसा वाव आहे, हेसुद्धा त्यांनी उदाहरणासह पटवून दिले. नवेगावबांध पर्यटनस्थळाचा इतिहास फार जुना आहे. परंतु या ऐतिहासिक स्थळाच्या विकासाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. परिणामी येथे मधल्या काळात वाढलेली पर्यटकांची संख्या आता रोडावली आहे. दरम्यान केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनस्थळ व तीर्थस्थळांचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाकडून ५० कोटी रुपयांचा निधी मिळविला. यातील ९ कोटी रुपये नवेगावबांध पर्यटनस्थळाच्या विकासासाठी लावले जाणार आहेत.

मात्र त्या कामांनाही अजून सुरूवात झालेली नाही. त्या निधीतून म्युझियम, लेझर शो, इको फ्रेंडली विश्रामगृह आदी सुविधा उभारल्या जाणार असल्याचे ना.पटेल यांनी सांगितले आहे. मात्र त्यासोबतच आता कृषी पर्यटनाला चालना देण्याची गरज अनेकांना वाटत आहे. शहरी भागात राहणार्‍या नागरिकांना आणि विशेषत: मुलांना शेती कशी पिकते यासह भाताची शेती कशी असते हेसुद्धा माहित नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हा औत्सुक्याचा विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यादृष्टीने विचार करून पावले उचलली तर या भागातील रोजगाराच्या संधी आणखी वाढून या भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

Web Title: Agricultural tourism with forest tourism also many people hope for possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.