कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन यार्डात स्थानांतरण अटळ
By Admin | Updated: May 4, 2017 00:55 IST2017-05-04T00:55:34+5:302017-05-04T00:55:34+5:30
मोक्षधाम मार्गावरील २० एकर परिसरात नव्याने तयार झालेल्या स्व. मनोहरभाई पटेल मार्केट यार्ड येथील

कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन यार्डात स्थानांतरण अटळ
गोंदिया : मोक्षधाम मार्गावरील २० एकर परिसरात नव्याने तयार झालेल्या स्व. मनोहरभाई पटेल मार्केट यार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्थानांतरण व्हावे अशी मागणी मागील काही वर्षापासून सुरु होती.त्या अनुसंगाने कोणत्याही परिस्थितीत ११ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्थानांतरण नवीन मार्केट यार्डमध्ये करण्यात येईल, अशी माहिती सुरेशकुमार अग्रवाल यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
मोक्षधाम मार्गावर सावराटोलीला लागून असलेल्या २० एकर जागेवर २००१ मध्ये स्व. मनोहरभाई पटेल मार्केट यार्ड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, निधीअभावी हे यार्ड तयार होण्यास उशीर होऊ लागले. शेवटी २००९ मध्ये राष्ट्रीय कृषी समय विकास योजना व लोकसहभागाच्या माध्यमातून बाजार समिती तयार करण्यासाठी निधीला मंजूरी मिळाली व हे काम सुरू झाले. सध्यास्थितीत या यार्डमध्ये चार मोठे लिलाव शेड, प्रशासकीय इमारत, १५०० मेट्रिक टन क्षमता असलेले दोन गोडावून, ७७ व्यापारी गाडे, पोलीस चौकी यासह शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच शेतकऱ्यांच्या निवासासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार, समितीच्या संचालक मंडळाने आज २ मे रोजी स्थानांतरण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, व्यापारी अडतीया संघाच्या वतीने समस्यांचे कारण पुढे करून स्थानांतरणाला विरोध करण्यात आला. त्यातच बाजार समितीने २ मे रोजी स्थानांतरण करण्याचा मूहूर्त साधला होता. मात्र, समस्यांना घेऊन अडतीया व्यापारी संघटनेच्यावतीने त्याला विरोध करण्यात आला. त्यावर बाजार समिती संचालक मंडळाने समस्यांचे निराकरण त्वरित करून घेण्याचा निर्णय घेतला. व्यापाऱ्यांसाठी हे स्थानांतरण थांबू नये, अशी भूमिका विद्यमान संचालक मंडळाने घेतली. कोणत्याही परिस्थिती ११ मे रोजी नवीन मार्केट यार्डमध्ये बाजार समितीचे स्थानांतरण होणार, अशी माहिती आयोजित पत्रपरिषदेत संचालक मंडळाने दिली. या विरोधात कालपासूनच सध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडतीया व्यापारी संघाच्यावतीने धान खरेदी बंद केली आहे. संचालक मंडळाने शेतकऱ्यांना नवीन मार्केट यार्डमध्ये फ्री सेल सुरु करण्यात आले असून, आपले धान फ्री सेलमध्येच विकण्याचे आवाहन केले आहे. आयोजित पत्रपरिषदेत कृऊबासचे उपसभापती धनलाल ठाकरे, संचालक सुरेशकुमार अग्रवाल, जगदीशप्रसाद अग्रवाल, अरुण दुबे, कुंदन कटारे, विठोबा लिल्हारे, पंकज यादव, तिर्थराज हरिणखेडे, आनंदराव तुरकर, मनोज दहीकर व इतर संचालक उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)