७ जुलैपर्यंत कृषी जागृती सप्ताह
By Admin | Updated: July 2, 2015 01:50 IST2015-07-02T01:50:47+5:302015-07-02T01:50:47+5:30
शेतकऱ्यांची निराशा दूर करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी विभागासह प्रत्यक्ष जोडून त्यांना कृषीसह इतर पूरक व्यवसायांची माहिती देण्यासाठी राज्य शासनाने ....

७ जुलैपर्यंत कृषी जागृती सप्ताह
गोंदिया : शेतकऱ्यांची निराशा दूर करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी विभागासह प्रत्यक्ष जोडून त्यांना कृषीसह इतर पूरक व्यवसायांची माहिती देण्यासाठी राज्य शासनाने कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य विभागाच्या वतीने १ ते ७ जुलैपर्यंत कृषी जागृती सप्ताह आयोजित केला आहे.
कृषी विकास दरात वाढ करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. परंतु राज्यात मागील काही वर्षांपासून कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षेनुसार पीक झाले नाही. त्यामुळेच शेतकरी आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत. या सप्ताहात शेतकऱ्यांना कृषीविषयी विविध उपक्रमांची माहिती देण्यात येईल. तसेच केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या शेतकरी हिताच्या योजनांच्या बाबत सांगण्यात येईल. राज्यात कृषी विश्वविद्यालय, केंद्रीय कृषी संशोधन संस्थेद्वारे विकसित केलेले आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सदर कार्यक्रम तालुका स्तरावरही आयोजित केले जात आहेत.
याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक, उपक्रमांचे नियोजन व क्रियान्वयन करण्यात राज्याच्या कृषी विश्वविद्यालय व त्याअंतर्गत येणारे संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, सर्व कृषी महाविद्यालय, कृषी तंत्रनिकेतन, साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, महाबीज, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ, वखार महामंडळासह कृषीशी संबंधित विभागांनी सहकार्य करण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. ग्राम स्तरावर शेतकरी मित्र, कृषी समुहाचे प्रतिनिधी व कृषीबाबत उत्पादन घेणाऱ्या कंपनींचे प्रतिनिधी, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य कार्यक्रमांत सहभागी होतील.
या सप्ताहादरम्यान आयोजित कार्यक्रमांसाठी वेगळ्या निधीची तरतूद नसल्यामुळे विविध योजनांसाठी उपलब्ध होणाऱ्या निधीतूनच सदर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यापूर्वीसुद्धा मागील खरीप हंगामाची सुरूवातीला असा प्रकारचे उपक्रम राज्यासह जिल्ह्यातसुद्धा आयोजित करण्यात आले होते. त्याअंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिर व शैक्षणिक सहलीचेही आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)