एजंसीच्या माध्यमातून सुरू आहे वृक्षलागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 22:16 IST2019-07-15T22:16:14+5:302019-07-15T22:16:34+5:30
शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत नगर परिषदेला यंदा चार हजार ७०० वृक्षलागवडीचे टार्गेट देण्यात आले आहे. असे असताना नगर परिषदेकडून पाच हजार २०० खड्डे खोदण्यात आल्याचे सांगीतले जात आहे.

एजंसीच्या माध्यमातून सुरू आहे वृक्षलागवड
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत नगर परिषदेला यंदा चार हजार ७०० वृक्षलागवडीचे टार्गेट देण्यात आले आहे. असे असताना नगर परिषदेकडून पाच हजार २०० खड्डे खोदण्यात आल्याचे सांगीतले जात आहे. विशेष म्हणजे, वृक्षलागवडसाठी खड्डे खोदण्याचे काम देण्यात आलेल्या एजंसीकडूनच आता वृक्षलागवड करवून घेतली जात असून अद्याप एक हजार २०० रोपट्यांची लागवड झाल्याचे सांगीतले जात आहे.
यंदा नगर परिषदेला चार हजार ७०० रोपट्यांचे टार्गेट देण्यात आले आहे. त्यानुसार नगर परिषदेकडून खड्डे खोदण्याचे काम करण्यात आले.यासाठी संबंधितांनी नगर परिषदेतील वादग्रस्त एजंसीलाच खड्डे खोदण्याचे काम देवून आपुलकी दाखवून दिली. चार हजार ७०० रोपट्यांचे टार्गेट असताना वृक्षलागवडसाठी आतापर्यंत पाच हजार २०० खड्डे खोदण्यात आल्याची माहिती अभियंता खापर्डे यांनी दिली. त्यातल्या त्यात आता वृक्ष लागवडीचे कामही त्याच एजंसीला देऊन टाकले आहे.
आता अर्धा महिना लोटला असून आतापर्यंत एक हजार २०० रोपटी लावण्यात आल्याचेही सांगीतले जात आहे. यासाठी पांगडी येथील वन विभागाच्या नर्सरीतून पाच हजार २०० रोपटी मागविण्यात आली आहे. मागील कित्येक वर्षांपासून नगर परिषदेने दिलेले टार्गेट कधीच सर केलेले नाही. त्यात यंदा दिलेल्या टार्गेटपेक्षा जास्त खड्डे खोदून वृक्ष लागवड करण्याचा पराक्रम नगर परिषद दाखवित असल्याने शंका व्यक्त केली जात आहे.
वृक्ष लावगडीचा २.९० कोटींचा प्रस्ताव
वृक्षलागवड अभियानाला घेऊन संबंधिताने १४ व्या वित्त आयोगातून २.९० कोटींचा एक प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्याची माहिती आहे. यांतर्गत शहरातील प्रत्येक प्रभागात वृक्षलागवडी करून त्यांना ट्री-गार्ड, खोदकाम, संवर्धनाचे काम एजंसीला दिले जाणार आहे. यासाठी निविदा बोलाविली जाणार असून ज्या एजंसीला हे काम जाईल त्यांना एक वर्ष झाडांची देखभाल करावयाची असून ११ हजार २०० झाडे लावण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे, आता या नव्या प्रयोगात कोणता नवा चमत्कार होतो का याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.