दोन महिन्यानंतर मृतदेहाला फुटली वाचा

By Admin | Updated: August 6, 2015 00:45 IST2015-08-06T00:45:15+5:302015-08-06T00:45:15+5:30

तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथील विनोद भांडारकर यांच्या शेतात दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली.

After two months, read the body dead | दोन महिन्यानंतर मृतदेहाला फुटली वाचा

दोन महिन्यानंतर मृतदेहाला फुटली वाचा

गुंगा शर्माचा खूनच : ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या महिलेसह साथीदारांचे कृत्य
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथील विनोद भांडारकर यांच्या शेतात दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली. गुंगा ऊर्फ नरेश ताराचंद शर्मा (३०) रा. देव्हाडी ता.तुमसर असे मृताचे नाव आहे. त्याचा खून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात आला असून सदर खून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ असलेल्या महिलेने व तिच्या अन्य सहकाऱ्यांनीच केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
रेल्वे गाड्यांमध्ये लाडू विकण्याचे काम करणारी विधवा आशा मोरेश्वर राजुके (५०) रा.खात ही मागील काही वर्षापासून मुंडीकोटा येथे राहाते. याच रेल्वेत खाद्य पदार्थ विकणाऱ्या गुंगा ऊर्फ नरेश ताराचंद शर्मा (३०) याचे त्या महिलेसोबत सूत जुळले. ते दोघे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये एकत्र राहू लागले. काही दिवसानंतर त्यांच्यासोबत राहण्यासाठी अजय व अन्य एक असे दोघे राहायला आले. ते सर्व एकत्र राहात असत. अजय व अन्य हे दोघेही घरफोड्या करणे, चोऱ्या करणे यात पटाईत असल्याने चोऱ्या करून आणलेल्या पैश्यातून त्यांची हिस्सेवाटणी होत असे. अश्याच एका चोरीच्या पैशातून गुंगा शर्माशी त्यांचा वाद झाला. गुंगाला कमी पैसे देण्यात आल्याने अजय व त्याच्या साथीदारासोबत त्याचे खटकले. एकाच घरात ते तिघेही आशासोबत राहात असल्याने आशाचे अजय व त्याच्या साथीदारांशी अनैतिक संबंध असल्याचा संशय गुंगा घेत होता. यामुळे गुंगाचा काटा काढण्याचा चंग आशा, अजय व अजयच्या साथीदाराने बांधला. मे च्या अखेरीस गुंगाला दारू पाजून गुप्ती आणि कुऱ्हाडीने मारून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणाचा उलगडा तिरोडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने केला.
अशी लावली मृतदेहाची विल्हेवाट
गुंगाचा खून कुऱ्हाड व गुप्तीने करून त्याचा मृतदेह गोधडीत बांधून त्यावर ब्लॅँकेट टाकून नायलॉनच्या दोरीने त्याला बांधले. सोबतच त्या मृतदेहाला मोठा दगड बांधून रात्रीच्यावेळी मुंडीकोटा येथील विनोद भांडारकर यांच्या शेतात असलेल्या विहीरीत मृतदेह फेकण्यात आला. त्यामुळे तो मृतदेह पाण्याचा वर आलाच नाही आणि दोन महिन्यानंतर तो मृतदेह वर आल्यानंतर त्याला वाचा फुटली.
असा दिसला मृतदेह
मुंडीकोटा येथील विनोद भांडारकर यांनी आपल्या शेतात केलेल्या रोवणीला पाणी देण्यासाठी सोमवारी मोटारपंप लावला. या मोटारपंपामुळे विहिरीतील पाणी बरेच कमी झाले. विहीरीतील पूर्ण पाणी आटले तर नाही म्हणून सदर शेतकरी पाहण्यासाठी गेले असता या मृतदेहाचे पाय पाण्याबाहेर असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी लगेच याची सूचना पोलिसांना दिली.
दोघांना अटक; दोन फरार
गुंगाच्या खून प्रकरणात मुंडीकोटा येथील राजू कांताराम बावने (२८) व आशा मोरेश्वर राजुके (५०) या दोघांना अटक करण्यात आली. त्या दोघांनी या खुनाची कबुली पोलिसांना दिली आहे. या खुनातील मुख्य आरोपी अजय व त्याचा साथीदार हे दोघेही फरार आहेत. गुंगाचा खून दोन महिन्यांपूर्वी झाला. मात्र या प्रकरणाची कसलीही वाच्यता गावात नसल्याने या प्रकरणाचा तपास करणे कठिण होते. परंतु पोलिसांनी रेल्वेतूनच ही माहिती घेतल्यामुळे पोलिसांना लवकरच धागेदोरे गवसले.

Web Title: After two months, read the body dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.