अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 21:10 IST2019-05-16T21:10:12+5:302019-05-16T21:10:37+5:30
विक्रेत्यांनी रस्त्यावर मांडलेले सामान हटवून रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने मागील आठवड्यात शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या मोहीमेमुळे शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त झाले होते. मात्र ही मोहीम पुन्हा थंडबस्त्यात गेल्याने रस्त्यांवरील अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाले आहे.

अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विक्रेत्यांनी रस्त्यावर मांडलेले सामान हटवून रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने मागील आठवड्यात शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या मोहीमेमुळे शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त झाले होते. मात्र ही मोहीम पुन्हा थंडबस्त्यात गेल्याने रस्त्यांवरील अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाले आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीची समस्या कायम आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुर्तफा व्यावसायीकांनी केलेले अतिक्रमण हटवून शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता शाहू यांच्या मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषदेने संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती.
ही मोहीम १०, ११ आणि १३ मे रोजी शहरात राबविण्यात आली. मोहीमे दरम्यान शहरातील काही भागातील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. त्यानंतर ही मोहीम पुन्हा थंडबस्त्यात गेल्याने शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणाची स्थिती जैसे थे झाली. त्यामुळे अतिक्रमणधारकांना सुध्दा या मोहीमेचा धाक राहिला नसल्याचे चित्र आहे.
ही मोहीम सुध्दा आत्तापर्यंत राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहीमेसारखीच इतिहास जमा झाली. शहरातील बाजार भागासह रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत रेल्वे स्टेशन व पाल चौक परिसरात वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.बाजार भागातील विक्रेत्यांनी रस्त्यावर सामान मांडून अतिक्रमण केले आहे. परिणामी दोन्ही बाजूंनी रस्ते अरूंद झाले आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. शहरातील मुख्य बाजारपेठेत पावला-पावलावर वाहतुकीची कोंडी होते.या प्रकारामुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूला विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण काढून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात होती.
याची दखल घेत पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी वाहतूक नियंत्रण विभागाला त्याबाबत सूचना दिल्या १० मे पासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती. तीन दिवस ही मोहीम राबविल्यानंतर पुन्हा थंडबस्त्यात गेली. यामुळे गुरूवारी (दि.१६) बाजार भागात व्यापाऱ्यांचे सामान पुन्हा रस्त्यांवर दिसून आले. यावरून गुरूवारी मोहीम राबविण्यात आली नसल्याचे दिसले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे सामान पुन्हा रस्त्यांवर बघावयास मिळाले. नेहरू चौका समोरील फुटपाथ तसेच नगर परिषद समोरील काही दुकानांची स्थिती जैसे थे दिसून आली.
सामान जप्त करण्याची मागणी
वाहतूक नियंत्रण शाखेने शुक्रवारी (दि.१०) राबविलेल्या मोहिमेत काही दुकानदारांनी रस्त्यावर मांडलेले सामान जप्त केले होते. जवळपास ३५ हजार रूपयांचे सामान जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र एवढ्यावरही येथील व्यापाºयांनी धडा घेतला नाही. त्यांच्याकडून रस्त्यांच्या काठावर सामान ठेवून पुन्हा वाहतुकीची कोंडी केली जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.