नऊ महिन्यांच्या संघर्षानंतर आली परिवहन महामंडळाला जाग

By Admin | Updated: April 24, 2015 01:42 IST2015-04-24T01:42:09+5:302015-04-24T01:42:09+5:30

देवरी ते कोहमारा डव्वा-गोरेगाव मार्गे गोंदियासाठी व परत याच मार्गे देवरीला येण्यासाठी बससेवा सुरू नव्हती.

After the nine month struggle, the transport corporation was awakened | नऊ महिन्यांच्या संघर्षानंतर आली परिवहन महामंडळाला जाग

नऊ महिन्यांच्या संघर्षानंतर आली परिवहन महामंडळाला जाग

गोंदिया : देवरी ते कोहमारा डव्वा-गोरेगाव मार्गे गोंदियासाठी व परत याच मार्गे देवरीला येण्यासाठी बससेवा सुरू नव्हती. त्यामुळे प्रवाशी व विद्यार्थ्यांना खूप त्रास होत होता. या समस्या एसटी महामंडळाच्या निदर्शनास आणूण देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता नरेश जैन यांनी केलेल्या नऊ महिन्यांच्या संघर्षाला यश आले आहे. एसटी महामंडळाने आता १ एप्रिलपासून देवरी-गोंदिया व्हाया कोहमारा-डव्वा-गोरेगावमार्गे बससेवा सुरू केली आहे.
सदर मार्गावर एकही बस धावत नसल्याने प्रवाशी व विद्यार्थ्यांमध्ये रोष पसरला होता. नरेश जैन यांनी ११ सप्टेंबर २०१४ रोजी विभाग नियंत्रक भंडारा यांना निवेदन दिले होते. १८ सप्टेंबरला आगार प्रमुख साकोली व गोंदिया यांनाही निवेदन दिले होते. २४ सप्टेंबर रोजी गोंदियाच्या आगार व्यवस्थापकांनी सदर बससेवा सुरू करण्याबाबत एक अहवाल विभाग नियंत्रक भंडारा यांना पाठविला होता. परंतु बससेवा सुरू करण्यात आली नाही. जैन यांनी विभागीय वाहतूक अधिकारी आदमने यांची भेट घेवून सदर बससेवा सुरू करण्याची मागणी केली.
त्यांच्या कार्यालयीन पत्रानुसार जैन यांना कळविण्यात आले की, गर्दीच्या दिवसात या मार्गावर प्रायोगिक तत्वावर बससेवा सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. ही कार्यवाही पूर्ण होताच आपल्याला सांगण्यात येईल. परंतु सहा महिने लोटूनही एसटीने कार्यवाही केली नाही. विशेष म्हणजे दिवाळीच्या गर्दीच्या दिवसांत व त्यानंतरही प्रायोगिक तत्वावर बसफेरी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे जैन सदर बससेवा सुरू होण्यासाठी सतत प्रयत्न करीत होते.
१७ नोव्हेंबर रोजी जैन यांनी विभाग नियंत्रक भंडारा यांना पत्र लिहून सर्व समस्या सांगितल्या व सदर बससेवा का सुरू करण्यात आली नाही, याचे कारण विचारले. मात्र बससेवा सुरू न होण्यामागे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा व त्यांचेच षडयंत्र असल्याचे दिसून येत असल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची आमदारांशी चर्चा
नरेश जैन यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आ. संजय पुराम यांना भेटले व याबाबत माहिती दिली. २८ जानेवारी २०१५ रोजी आ. पुराम यांनी विभाग नियंत्रक भंडारा यांना एक पत्र देवून सदर बससेवा अविलंब सुरू करण्याची मागणी केली. याच्या एक महिन्यानंतरही बस सुरू करण्यात आली नाही. ही बाब जैन यांनी आ. पुराम यांच्या कानावर घातली. पुराम यांनी दुसरे पत्र लिहून विभाग नियंत्रकावर कारवाई करण्यात येईल, असे सांगताच एसटीचे अधिकारी झोपेतून जागे झाले व परिणामी १ एप्रिलपासून बससेवा सुरू करण्यात आली.
पहिलीच फेरी मार्ग फलकाशिवाय
एसटीने नवीन शेड्युलची बस चालू न करता एक एप्रिल रोजी शेड्यूल क्रमांक-१०३ ची गोंदिया-फुक्कीमेटा-देवरी व्हाया कोहमारा-गोंदियासाठी १०.१५ वाजता बस सोडली. गोंदिया ते आमगाव फुक्कीमेटामार्गे देवरी येथे येऊन केवळ कोहमारामार्गे गोंदियासाठी देवरीवरून सोडण्यात आली. दरदिवशी ही बस फुक्कीमेटावरून देवरी व परत १०.१५ वाजता सरळ आमगावमार्गे गोंदियाला जात होती. त्यामुळे आमगावला जाणारे प्रवाशी हैरान झाले. त्या बसवर मार्गाचे फलकसुद्धा लावले नव्हते. याबाबत जैन यांनी प्रवाशांसह चालकाची विचारपूस केली. त्यावेळी ही बस कोहमारामार्गे गोंदियाला जाईल, असे सांगण्यात आल्यावर सर्वांना धक्काच लागला. कारण आमगावला जाण्यासाठी कोणतीही बस उपलब्ध नव्हती.

Web Title: After the nine month struggle, the transport corporation was awakened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.