अखेर पोटनिवडणूक रद्द
By Admin | Updated: April 2, 2016 02:12 IST2016-04-02T02:12:01+5:302016-04-02T02:12:01+5:30
पोटनिवडणुकीला घेऊन मागील २२ मार्चपासून सुरू असलेला तिढा अखेर सुटला. मतदार दायीत घोळ झाल्याच्या कारणावरून ....

अखेर पोटनिवडणूक रद्द
निवडणूक आयोगाचे आदेश : मतदार यादीतील घोळामुळे लागले ग्रहण
गोंदिया : पोटनिवडणुकीला घेऊन मागील २२ मार्चपासून सुरू असलेला तिढा अखेर सुटला. मतदार दायीत घोळ झाल्याच्या कारणावरून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने ही पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव यांनी त्याबाबतचा लेखी आदेश शुक्रवारी जारी केला.
शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील सदस्य अनिल पांडे यांचा अपघाती मृत्यू झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक घेतली जाणार होती. मात्र या पोटनिवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत प्रभाग क्रमांक २ मधील सुमारे २७०० मतदारांचा एक भाग प्रभाग क्रमांक १ मध्ये जुळला होता. यावर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व सभापती जितेंद्र पंचबुद्धे यांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
इकडे मतदार यादीतील घोळ लक्षात घेत मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांनी कर विभागातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबीत केले, तर दुसरीकडे मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून मुख्याधिकारी वाहूरवाघ यांनाही शुक्रवारी निलंबीत करण्यात आले. यासोबत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून प्रभाग क्रमांक १ ची पोटनिवडणूकही रद्द करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ संपण्यासाठी आता अवघे आठ महिने शिल्लक आहेत. त्यामुळे सदर पोटनिवडणुकीत विजयी होणाऱ्या नगरसेवकाला अवघा ६ ते ७ महिन्याचा कार्यकाळ लाभला असता. आता ही निवडणूकही रद्द झाल्यामुळे निवडणूक आयोगाकडून पुढील अधिसूचना कधी निघेल आणि त्यानंतर पोटनिवडणूक कधी होईल, आणि विजयी उमेदवाराला नगरसेवकपदी राहण्यासाठी किती कार्यकाळ लाभेल यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. मतदार यादीतील घोळ दुरूस्त करून नव्याने मतदार यादी तयार करण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्या रद्द झालेली ही निवडणूक काही दिवसानंतर होईल की नाही, की थेट सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत हा मतदार संघ रिकामाच राहणार याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. (शहर प्रतिनिधी)
उमेदवारांच्या उत्साहावर विरजण
पोटनिवडणुकीसाठी सध्या तरी नऊ उमेदवार रिंगणात होते. यात भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस व शिवसेनेने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे प्रभाग क्रमांक १ मध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. उमेदवारांनी आपले होर्डीग लावून प्रचाराचे कामही सुरू केले होते. मात्र मधातच राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून निवडणूक रद्द करण्यात आल्याने उमेदवारांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.