५५ वर्षानंतरही होतेय मराठीची गळचेपी

By Admin | Updated: February 27, 2015 00:43 IST2015-02-27T00:43:03+5:302015-02-27T00:43:03+5:30

‘लाभले अम्हास भाग्य, बोलतो मराठी,’ या कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओळी वाचल्या की, आम्ही मराठी असल्याचा अभिमान वाटतो. पण गोंदियात आल्यानंतर हे चित्र अगदी उलट दिसते.

After 55 years, the language of Mumbai's mouth | ५५ वर्षानंतरही होतेय मराठीची गळचेपी

५५ वर्षानंतरही होतेय मराठीची गळचेपी

लोकमत दिन विशेष
मनोज ताजने गोंदिया
‘लाभले अम्हास भाग्य, बोलतो मराठी,’ या कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओळी वाचल्या की, आम्ही मराठी असल्याचा अभिमान वाटतो. पण गोंदियात आल्यानंतर हे चित्र अगदी उलट दिसते. इथे मराठी माणसांनीच मराठीचे अस्तित्व गहाण ठेवले आहे. ‘सी.पी. अ‍ॅन्ड बेरार’ या हिंदी प्रांतातून महाराष्ट्रात समाविष्ठ होऊन ५५ वर्षे झाली तरी गोंदियावासीयांवर असलेला हिंदीचा प्रभाव कमी झालेला नाही.
छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या हिंदी राज्यांच्या सिमेवर वसलेल्या गोंदिया जिल्ह्याशी दोन्ही राज्यातील लोकांचा अतिशय निकटचा संबंध आहे. त्यामुळे व्यापारी शहर असलेल्या गोंदियात दोन्ही राज्यातील हिंदी भाषिक लोक नियमितपणे खरेदीच्या निमित्ताने येत असतात. एवढेच नाही तर गोंदिया शहरातील बहुतांश हिंदी भाषिक लोकांचे नातेवाईकसुद्धा दोन्ही छत्तीसगड, मध्यप्रदेशातीलच आहेत. त्यामुळे गोंदिया शहरवासीयांसाठी हिंदी हिच व्यवहारभाषा रूढ झाली आहे.
पूर्वी सीपी अ‍ॅन्ड बेरार (मध्य प्रांत) या राज्यात समाविष्ठ असलेला तत्कालीन गोंदिया तालुका १ मे १९६० ला महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्रात समाविष्ठ झाला. मात्र गोंदिया शहरवासीयांवर ५५ वर्षानंतर अजूनही हिंदी संस्कृतीचाच पगडा आहे.
वास्तविक कोणत्याही प्रांतात राहणाऱ्या व्यक्तीला त्याची बोलीभाषा कोणतीही असली तरी व्यवहारभाषा ही त्या राज्याची राजभाषा हीच असते. मात्र गोंदिया शहर त्यासाठी अपवाद ठरले आहे. मुंबईसारख्या महानगरात राहणारी कोणतीही गैरमराठी व्यक्ती मराठी बोलू शकत नसली तरी किमान मराठीतील संवाद समजू शकते. मात्र गोंदियातील काही लोक मराठी बोलणे तर दूर, मराठीतील संवाद समजूही शकत नाही. मराठीची होत असलेली ही गळचेपी पाहिल्यानंतर येथील मराठी लोकांची कीव आल्याशिवाय राहात नाही. विशेष म्हणजे मराठीची होत असलेली गळचेपी दूर करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरही कोणतेही उपाय केले जात नाही हे विशेष.
नगर परिषदेच्या अर्ध्या शाळा हिंदी माध्यमातील
गोंदिया नगर परिषदेच्या शहरात एकूण १९ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी १० शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. उर्वरित ८ शाळा हिंदी माध्यमाच्या तर एक शाळा इंग्रजी माध्यमाची आहे. त्यातील तीन हिंदी माध्यमाच्या शाळा आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना विद्यार्थी मिळत नसल्यामुळे त्या शाळा बंद करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र सुदैवाने मराठी शाळा अजून बंद पडलेल्या नाहीत. परंतू हिंदी भाषिक विद्यार्थी इतर खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जात असल्यामुळे हिंदी शाळांना विद्यार्थि मिळणे कठीण झाले आहे.
शेवटी नगर परिषदेचा कारभार मराठीतून झाला
गोंदिया नगर परिषदेची स्थापना होऊन १०० वर्षे होऊन गेले. अगदी अलिकडच्या काळापर्यंत या नगर परिषदेचा कारभार हिंदीतून सुरू होता. महाराष्ट्रातील हिंदीतून कारभार चालणारी गोंदिया नगर परिषद एकमेव होती. राज्यात सर्व सरकारी कार्यालयांचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार मराठीतून चालत असताना गोंदियात मात्र हिंदीच राजभाषा कायम होती. मात्र २००९ मध्ये तत्कालीन मुख्याधिकारी विजय गोरे यांनी नगर परिषदेचा कारभार मराठीतूनच चालेल असे सांगितले. शेवटी २००९ पासून गोंदिया नगर पालिकेतील प्रोसेडिंगसह सर्व कारभार मराठीतून सुरू झाला.
घरी मराठी, बाहेर मात्र हिंदीतच संभाषण
गोंदिया शहरात सिंदी, मारवाडी, गुजरात, जैन, शिख असे सर्व समाजातील लोक राहात असले तरी ७० टक्के लोक मराठी आहेत. मात्र येथील मराठी लोक केवळ आपल्या घरीच मराठीत बोलतात. बाहेरील व्यवहारात मात्र बहुतांश लोक हिंदीचाच वापर करतात. हिंदी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण झालेले काही मराठी लोक तर घरीसुद्धा हिंदीतच बोलतात. एवढेच नाही तर बाहेर भेटलेले दोन मराठी लोकही बहुतांश वेळा हिंदीतूनच संभाषण करताना दिसतात. त्यामुळे ते मराठी आहेत की हिंदी असा प्रश्न त्यांचे संभाषण ऐकणाऱ्यांना पडतो.

Web Title: After 55 years, the language of Mumbai's mouth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.