तब्बल ५० वर्षांनी लागले कटंगला फळ

By Admin | Updated: April 27, 2015 00:29 IST2015-04-27T00:29:28+5:302015-04-27T00:29:28+5:30

ग्रामीण भागात काटेरी बांबूची झाडे असतात, त्यांना कटंग म्हणतात. कटंगला ६० वर्षांनी फळ लागते,

After 50 years, katanga fruit was started | तब्बल ५० वर्षांनी लागले कटंगला फळ

तब्बल ५० वर्षांनी लागले कटंगला फळ

१०० ते २०० रूपये किलो : विविध स्वादिष्ट व्यंजनांसाठी उपयोग
विजय मानकर सालेकसा
ग्रामीण भागात काटेरी बांबूची झाडे असतात, त्यांना कटंग म्हणतात. कटंगला ६० वर्षांनी फळ लागते, अशी माहिती वृद्ध सांगतात. त्यांच्यानुसार सन १९६६ मध्ये कटंगच्या झाडांना फळ लागले होते. त्यानंतर ५० वर्षांनंतर आता सन २०१५ मध्ये परिसरात सर्वत्र कटंगला फळे लागली आहेत.
कटंगाचे लाकूड मजबूत व टिकावू असून ग्रामीण भागात कौलारू घरांसाठी केला जातो. शिवाय इमारती व इतर कामासाठी वापर केला जातो. कटंगाचे खाली पडलेले फळ गोळा करून त्यांचे तांदूळ तयार करून भाकरी बनविल्या जातात. तसेच काही लोक ते तांदूळ विकून अर्थार्जन करीत आहेत. प्रथम कटंगाचे फळ व त्यापासून तयार होणारे तांदूळ पाहून अनेकांना नवल वाटत आहे. कटंगचे फळ जवच्या फळासारखे असते. त्यापासून तयार केलेले तांदूळ गव्हासारखे दिसतात. मात्र त्यात चिकटपणा कमी असल्याने पोळीऐवजी भाकर बनविणे जास्त सोईस्कर असते. या भाकरीचा स्वाद मिळताजुळता तांदळाच्या भाकरीसारखा असतो.
वयोवृद्धांनी सांगितलेल्या माहितीनुसार, कटंग ६० वर्षांनी एकदा फळाला येतो. मात्र या वेळी ५० वर्षांनी फळाला आले असून, १० वर्षांपूर्वीच कसे फळाला आले, याचे आश्चर्य वयोवृद्धांना होत आहे. त्यांच्यानुसार, कटंगचे झाड एकदा फळले की आपोआपच नष्ट होते व पुन्हा काही कामाचे नसते. पुढे प्रकृतीने नवीन झाड उगवले तर पुढील काळात फळ येतात, असे म्हणतात. यावर्षी सर्वत्र कटंगच्या झाडांना बहर आला असून प्रत्येक झाड जुने असो किंवा नवे सर्वांना कटंग फळलेले दिसत आहे.
कटंगाचे झाड रांझी स्वरूपात असून याची जाडी बांबूपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट असून मजबूत असते. एकाच तनाला खालीपासून वरपर्यंत काटेरी शाखा असतात. त्यामुळे प्रत्येक बुडापासून निघालेले तन व त्यांच्या शाखा एकमेकात फसलेली असतात. या झाडावर चढने शक्य नसते. त्यामुळे खाली पडलेले फळ गोळा करणे सोईस्कर ठरते.

आरोग्यवर्धक कटंगचे तांदूळ
तांदूळ व गव्हामध्ये असणारे पोषक तत्त्व कटंगमध्ये असतात. प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. पाचक, स्वास्थवर्धक, पोटांच्या विकारावर विशेषकरून यकृताच्या विकारावर लाभदायक असते. कटंगपासून बनणाऱ्या तांदळाचे भात, खीर, लाडू व इतर व्यंजन बनविले जाते. तसेच पिठापासून भाकर, भजे, खीर, मुष्ठे, थापोडे यासारखे स्वादिष्ट व्यंजन तयार केले जाऊ शकतात. कटंगच्या तांदळाला किंवा पिठाला इतर अन्नधान्यातही मिसळून उपयोगात आणले जातात. ग्रामीण भागातील लोकजीवनात एकदा तरी कटंगाचे भात किंवा भाकर खाल्यास स्वत:ला भाग्यवान समजले जाते. त्यामुळेच कटंगाचे तांदूळ १०० ते २०० रूपये प्रतिकिलोप्रमाणे विकले जाते. खाण्याची आवड असलेले लोक पैशाची पर्वा न करता खरेदी करून घेतात.

दुष्काळात कटंगच्या तांदळाचा वापर
सन १९६६ मध्ये मोठा प्रमाणात कटंगला फळ आले होते. त्यावर्षी सर्वत्र कोरड्या दुष्काळाचा फटका बसला होता. अन्नधान्याचा अभाव झाला होता. तेव्हा अनेक लोक कटंगचे फळ गोळा करून त्यापासून मिळणाऱ्या तांदळाने आपला उदरभरण करीत दिवस भागवेत होते, असे सांगितले जाते. परंतु आता ५० वर्षांनी मोठे परिवर्तन घडले असून अन्नधान्याचे भरपूर भांडार असल्याने केवळ शौक किंवा आवड तर काही जन आठवण म्हणून कटंगच्या तांदळाचा उपयोग करीत आहेत.

Web Title: After 50 years, katanga fruit was started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.