उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहीम
By Admin | Updated: April 26, 2017 00:53 IST2017-04-26T00:53:38+5:302017-04-26T00:53:38+5:30
शेतकऱ्यांनी २० दिवसांच्या आत तालुका कृषी अधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावे,

उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहीम
कृषी यांत्रिकीकरण : शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले
गोंदिया : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी राज्य शासनाने उन्नत शेती-समृध्द शेतकरी ही मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. या मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांना अवजारे-यंत्रांचा पुरवठा अनुदानावर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी २० दिवसांच्या आत तालुका कृषी अधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावे, अशी सूचना कृषी अधिकाऱ्यांनी केली.
या मोहिमेंतर्गत ट्रॅक्टर-लहान ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, मोगडा(कल्टीव्हेटर), सर्वप्रकारचे प्लांटर, मळणी यंत्र, भात लावणी यंत्र, पॉवर विडर, रिपर व रिपर बार्इंडर, भात मळणी यंत्र, मिनी भात मिल, दाल मिल व पुरक यंत्र संच, ऊस पाचट कुट्टी/थ्रेशर/मल्चर, ट्रॅक्टरचलीत फवारणी यंत्र, मिस्ट ब्लोअर, सबसॉईलर यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. कृषी यांत्रिकीकरणासाठी विविध योजनेंतर्गत जिल्ह्यात प्राप्त होणाऱ्या निधीच्या लक्षांकाच्या मर्यादेत लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. अर्ज करण्याचा कालावधी २० दिवसांचा आहे. कृषी यांत्रिकीकरणाकरिता अनुदानाचा लाभ देण्यासाठी अर्जाचा विहीत नमुना कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करु न दिला आहे. याच नमुन्यात शेतकऱ्यांनी अर्ज करायचे आहेत.
केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी ज्या यंत्र/अवजाराचे रितसर परीक्षण करु न ते बी.आय.एस. अथवा अन्य सक्षम संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार/तांत्रिक निकषानुसार असल्याचे प्रमाणित केले असेल त्याच यंत्र/अवजारांची खुल्या बाजारातून खरेदी करावयाची आहे. अनुदानाकरिता देयक सादर करताना त्याचे प्रमाणपत्र, तपासणी अहवाल सादर करायचे आहे.
प्राप्त आर्थिक लक्ष्यांकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. अर्ज सादर केल्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पूर्वसंमत्ती प्रदान केल्यानंतर त्यानुसार खुल्या बाजारातून अवजारे खरेदी केल्यानंतर अनुदान देय राहील. लाभार्थ्याने विहीत नमून्यातच अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. अर्जाचा नमूना तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा मंडळ कृषी अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध आहे. अर्जासोबत सात-बारा व आठ-अ नमुना, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास जातीचे वैधता प्रमाणपत्र, आधार कार्डची झेरॉक्स प्रत, बँकेचे खाते क्र मांक, बँकेचे नाव, आयएफएससी कोड क्र मांकासह, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत, अनुदानावर खरेदी करावयाचा अवजाराचा तपशिल, यापूर्वी अनुदान घेतले नसल्यास संमत्तीपत्र, तालुका कृषी अधिकारी यांची पूर्वसंमत्ती मिळाल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत अवजारे/यंत्र खुल्या बाजारातून घ्यावे लागणार आहेत. अन्यथा दिलेली पूर्वपरवानगी रद्द राहील, असे संमत्तीपत्र व खरेदी करावयाच्या अवजारांचे/यंत्राचे अधिकृत विक्रेत्यांचे दरपत्रक अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.