खासदारांच्या दत्तक गावाला सिंचनाची आस
By Admin | Updated: December 27, 2014 22:52 IST2014-12-27T22:52:21+5:302014-12-27T22:52:21+5:30
गोरेगाव तालुक्यातील अवघ्या ३८०० लोकवस्तीचे पाथरी म्हणजे पारंपरिक ग्रामीण संस्कृतीने नटलेले एक खेडेगाव. शेती आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तेथील गावकऱ्यांनी कधी विकासाचे

खासदारांच्या दत्तक गावाला सिंचनाची आस
पटेलांचा पुढाकार : गावकऱ्यांना हवे शेतीला पाणी, हाताला काम अन् घामाला दाम
मनोज ताजने - गोंदिया
गोरेगाव तालुक्यातील अवघ्या ३८०० लोकवस्तीचे पाथरी म्हणजे पारंपरिक ग्रामीण संस्कृतीने नटलेले एक खेडेगाव. शेती आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तेथील गावकऱ्यांनी कधी विकासाचे फार मोठे स्वप्न पाहीले नाही. मुलभूत सुविधा मिळाल्या तरी पुरेसे एवढीच या गावातील लोकांची इच्छा होती, पण माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी हे गाव दत्तक घेतले आणि येथील गावकऱ्यांनाही विकासाची स्वप्नं पडू लागली. ‘लोकमत’ने या गावात जाऊन तेथील विविध स्तरातील लोकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी विविध अपेक्षा व्यक्त केल्या.
पाथरी गावात सर्वच समाजाचे लोक राहतात. पण गावातील सामाजिक पार्श्वभूमी अतिशय चांगली आहे. त्यांच्यात कधीही धार्मिक, जातीय तेढ निर्माण झालेली नाही. गावातील कोणतेही भांडण-तंटे गावातच मिटविण्याचा येथील प्रघात आहे. बहुतांश लोक शेतीवर उपजीविका करणारे आहेत. पण जवळच असलेल्या कटंगी प्रकल्पात या गावातील १५० ते २०० लोकांची शेतजमीन गेली. त्यामुळे अनेकांना उपजीविकेसाठी गाव सोडून जावे लागले.
कटंगी प्रकल्पासाठी शेतजमिनी देऊनही त्या प्रकल्पाचे पाणी या गावकऱ्यांना मिळू शकत नाही ही येथील गावकऱ्यांची सर्वात मोठी खंत आहे. कारण हे गाव आणि लगतच्या शेतजमिनी उंच आहे तर प्रकल्पाचे स्थळ खालच्या भागाला आहे. त्यामुळे गावात थेट पाणी पोहोचू शकत नाही. मात्र लिफ्ट करून (उपसा सिंचन योजना) प्रकल्पाचे पाणी शेताला द्यावे अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.
शेतीला पाण्याची सोय झाली तर पाथरीतील शेतकरी रबी हंगामातही धानाचे पिक घेऊन संपन्न होतील, अशी त्यांना आशा आहे. प्रकल्पाचे पाणी शेतीला मिळत नसेल तर शेतकऱ्यांच्या शेतात शासनाने बोर करून द्यावी अशी अपेक्षा शिवाजी सोनेवाने यांनी व्यक्त केली.
या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या काही प्रमाणात आहे. गावात जलस्वराज्य प्रकल्पातून आधी एक पाण्याची टाकी तयार केली होती. पण ती अपुरी पडत असल्याने ७४ लाख रुपये खर्चुन नवीन टाकी तयार करण्यात आली. मात्र त्या टाकीला साजेशी पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे जुन्याच पाईपलाईनवरून काम भागविले जात आहे. नवीन पाईपलाईन टाकल्यास योग्य प्रमाणात पाणी मिळण्यास मदत होईल, असे माजी उपसरपंच भरत ठाकूर यांनी सांगितले. गावातील काही हातपंप चालू तर काही बंद स्थितीत आहेत. विशेष म्हणजे गावातील काही विहिरी आणि त्यावरील हातपंपाचे पाणी खारे आहे. ते पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सर्वस्वी नळ योजनेच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते.
जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंतच्या वर्गांची सोय आहे. पुढील शिक्षणासाठी १ किलोमीटरवर असलेल्या कुऱ्हाडी गावात जावे लागते. प्राथमिक आरोग्य केंद्रही कुऱ्हाडीत आहे. एक किलोमीटरचे अंतर पार करताना गावकऱ्यांना कोणतीही अडचण नाही.
मात्र गावातील रस्ते, नाल्यांची दुरूस्ती करण्यासाठी बराच वाव आहे. तुटफूट झालेले, उखडलेले रस्ते दुरूस्त केल्यास आणि नाल्यांची योग्य बांधणे करून सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीने केल्यास या गावाच्या सौंदर्यात अधिक भर पडेल. प्रफुल्ल पटेलांसारख्या मोठ्या नेत्याने हे गाव दत्तक घेतल्यामुळे गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.