प्रशासकीय भवनाचे काम सहा महिन्यांपासून ठप्प
By Admin | Updated: April 27, 2015 00:27 IST2015-04-27T00:27:13+5:302015-04-27T00:27:13+5:30
सर्व प्रशासकीय कार्यालये एकाच इमारतीत ठेवण्याचे स्वप्न उराशी बाळगून यासाठी निधी उपलब्ध करविण्यात आला.

प्रशासकीय भवनाचे काम सहा महिन्यांपासून ठप्प
शासनाकडून निधीच नाही : कंत्राटदाराची दीड कोटींची बिले थकीत
सालेकसा : सर्व प्रशासकीय कार्यालये एकाच इमारतीत ठेवण्याचे स्वप्न उराशी बाळगून यासाठी निधी उपलब्ध करविण्यात आला. मोठ्या जोमात प्रशासकीय भवनाचे काम सुरू करण्यात आले. मात्र सत्ता परिवर्तन झाले व सत्ते आलेल्यांच्या मनात परिवर्तन झाले. त्यांच्या मनातील हे परिवर्तन तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय भवनाच्या कामावरही स्पष्टपणे दिसून येत आहेत. सालेकसाच नव्हे तर देवरी व आमगाव येथील तहसील कार्यालयांचेही काम मागील सहा महिन्यांपासून बंद पडून आहे. यांचे काम कधी सुरू होणार याची साधी माहितीही देण्यासाठी कुणी तयार नसल्याचे चित्र आहे.
येथील तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय भवनाचे बांधकाम जून २०१४ मध्ये सुरू करण्यात आले. तीन कोटी ९६ लाख रूपयांच्या निधीतून या भवनाचे बांधकाम करण्यात येणार आहे. कंत्राटदाराने मोठ्या जोमाने हे बांधकाम सुरू केले होते व हे बघता १ मे पर्यंत या प्रशासकीय भवनाचे उद्घाटन व्हायला हवे होते. मात्र बील न निघाल्याने कंत्राटदाराने काम बंद पाडले आहे. परिणामी या भवनाचे बांधकाम अडकून पडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शासनाकडून आतापर्यंत एक कोटी रूपयेच मिळाले आहेत. त्यातही विशेष गोष्ट अशी की, मार्चनंतर नवीन वर्षासाठी मंजूर करण्यात आलेल्या बजटमध्ये या कामासाठी निधीचा प्रावधान करण्यात आलेला नाही. अशात भविष्यातही या कामासाठी निधी मिळणार की नाही याबाबत सांगण्यास कुणीही तयार नाही. (प्रतिनिधी)
कंत्राटदाराचे दीड कोटींचे बिल अडकून
शासनाने नवीन बांधकामासाठी मागील सहा महिन्यांपासून निधी उपलब्ध करून दिला नाही. एवढ्यावरही कंत्राटदाराने आपल्याकडील रक्कम लावून काम पुढे वाढविले. मात्र आता कंत्राटदाराचे दीड कोटींचे बील शासनाकडे पडून आहेत. यामुळे कंत्राटदाराने बांधकाम बंद पाडले. शिवाय नवीन वर्षाच्या बजेटमध्ये नवीन कामांसाठी निधीचे प्रावधान करण्यात आलेले नाही. अशात जुने बील अडकून पडले असताना कंत्राटदार काम सुरू करणार नाही. कारण त्याचे जुने पैसे अडकून पडले आहेत.