रेमडेसिविर, ऑक्सिजन व औषध साठ्यावर प्रशासनाचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:29 IST2021-04-24T04:29:01+5:302021-04-24T04:29:01+5:30

गोंदिया : जिल्ह्यातील एकही कोरोनाबाधित रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करीत आहेत. मात्र बाधितांच्या संख्येत ...

Administration's focus on remedicivir, oxygen and drug reserves | रेमडेसिविर, ऑक्सिजन व औषध साठ्यावर प्रशासनाचे लक्ष

रेमडेसिविर, ऑक्सिजन व औषध साठ्यावर प्रशासनाचे लक्ष

गोंदिया : जिल्ह्यातील एकही कोरोनाबाधित रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करीत आहेत. मात्र बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने त्यातुलनेत उपचारात्मक उपाययोजना कमी पडत आहेत, हे मान्य आहे. पण जिल्ह्यातील सर्व रुग्णांना वेळीच उपचार मिळावे, हा आपला प्रयत्न आहे. वाढता संसर्ग लक्षात घेता, जिल्ह्यातील रुग्णांलयांमध्ये बेडची व्यवस्था वाढविण्यात आली आहे. औषधसाठा, रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन या सर्व बाबींवर प्रशासनाचे नियंत्रण असल्याचे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीशी लढा देत असताना, अनेक समस्यांना यंत्रणेला समोर जावे लागत आहे. या बाबीला घेऊन (दि. २२) जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी मीना यांनी दिली. जिल्ह्यात वाढत्या रुग्णांच्या संख्येनुरूप पर्याप्त बेडच्या व्यवस्थेसाठी पालकमंत्री नवाब मलिक व खा. प्रफुल्ल पटेल व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार जिल्हा क्रीडा संकुल, पॉलिटेक्निक येथे डीसीएचसी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. दोन्ही डीसीएचसीमध्ये जवळपास २५० ते ३०० बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र, या सर्व उपाययोजना करताना कुठेतरी वाढत्या ताणामुळे आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. यासाठी मनुष्यबळ पूर्तता करण्याच्या अनुषंगाने यंत्रणा प्रयत्नशील आहे. पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरतीही केली जात आहे. आगामी काळात गोंदिया जिल्ह्यात उपचारात्मक उपाययोजना सबळ करण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु, संसर्गाशी लढा देताना जनतेचे सहकार्य महत्त्वाचे आहे. लसीकरणामध्ये जनतेने हिरीरीने सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, मुख्याधिकारी करण चव्हाण, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, पोलीस अधिकारी, अन्न व औषध विभागाचे अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

.......

जिल्ह्यात ९११ ऑक्सिजनयुक्त बेड

वाढत्या रुग्णानुरूप बेडची व्यवस्था वाढविण्यात आली आहे. १८ खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गोंदिया येथील डीसीएचसह खासगी रुग्णालयांमध्ये आजघडीला ९११ ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये जवळपास १२०० रुग्णांची व्यवस्था आहे.

.......

जिल्हा क्रीडा संकुलात ऑक्सिजन प्लांट

जिल्हा क्रीडा संकुल येथे ७५ लाख रुपयांच्या निधीतून ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार, त्याचप्रमाणे अदानीच्या मदतीने गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन टॅंक उभारण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. आजघडीला गोंदिया जिल्ह्यात मागणीनुरूप ऑक्सिजनचा पुरवठा नियमित होत आहे. त्याचप्रमाणे रेमडेसिविर इंजेक्शनचे नियोजन समप्रमाणात करण्यात आले आहे. औषधीसाठा कमी पडणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.

.......

ग्रामीण भागातही डीसीएचसी सुरू करणार

जिल्हास्तरावरील डीसीएचसी व डीसीएच तसेच खासगी रुग्णालयाचे ताण कमी करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव, सालेकसा या ठिकाणी डीसीएचसी सुरू करण्याचे नियोजन आहे. अर्जुनी मोरगाव येथील डीसीएचसीमध्ये देवरी, सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव या तीन तालुक्यांचा, तर सालेकसा येथे आमगाव, गोरेगाव व सालेकसा या तीन तालुक्यांतील रुग्णांवरील उपचार करता येणार आहे. प्रत्येक डिसीएचसीमध्ये ७० ते १०० बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Web Title: Administration's focus on remedicivir, oxygen and drug reserves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.