‘त्या’ अनाथ मुलाच्या उपचारासाठी प्रशासन सज्ज
By Admin | Updated: July 2, 2015 01:44 IST2015-07-02T01:44:14+5:302015-07-02T01:44:14+5:30
तिरोडा येथील जगजीवन वार्डातील भूखबळी ठरलेल्या ललिता शिवकुमार रंगारी यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी राज्यशासनाने जबाबदारी स्वीकारली.

‘त्या’ अनाथ मुलाच्या उपचारासाठी प्रशासन सज्ज
आरोग्य विभागाचा पुढाकार : बुधवारी हलविले केटीएसमध्ये
गोंदिया : तिरोडा येथील जगजीवन वार्डातील भूखबळी ठरलेल्या ललिता शिवकुमार रंगारी यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी राज्यशासनाने जबाबदारी स्वीकारली. आता आरोग्य प्रशासनाने त्यांच्या संपूर्ण चाचण्या व औषधोपचारासाठी पुढाकार घेतला आहे.
मागील तीन दिवसांपासून तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या मुलाला बुधवार (दि.१) दुपारी १२ वाजता वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम व उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे यांच्या उपस्थितीत केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात १०८ क्रमांकाच्या इमर्जंसी मेडीकल सर्व्हिस या अॅम्बुलंसने हलविण्यात आले. बुद्धघोष शिवकुमार रंगारी (१८) असे त्या मुलाचे नाव असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी त्याचे संपूर्ण चाचण्या करवून घेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे, असे डॉ. हिंमत मेश्राम यांनी सांगितले.
तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात अत्याधुनिक यंत्रांची सोय नसल्यामुळेच सदर निर्णय घेण्यात आला. बुद्धघोषच्या डोळ्यांमध्ये काहीतरी फरक आहे. मात्र परिसरातील नागरिकांकडून जन्मापासूनच त्याचे डोळे तसे असल्याचे सांगण्यात आले आहे. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात बुद्धघोषच्या डोळ्यांची फंडोस्कोपी व रेटिनोस्कोपी करण्यात येणार आहे. याशिवाय आयक्यू टेस्ट (इंटिलिजंट कोशंट), सिटी स्कॅन व तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी त्याच्या मामानेसुद्धा नाकारल्याने आता शासनालाच योग्य पाऊल उचलने भाग आहे.
‘स्पीच थेरपी’ देणार
तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात बुद्धघोषला आंघोळ घालून त्याला जेवू घालण्यात आले व नंतर तेथील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले. येथे संपूूर्ण औषधोपचारानंतर समाजकल्याण विभागाच्या वतीने त्याला मतिमंद शाळेत घालण्यात येणार आहे. मागील सहा महिन्यांपासून त्याच्या आईची बिडी पेंशन मिळाली नसल्याने ती काढण्यासाठी शासनाने निर्देश दिले आहेत. बुद्धघोषला स्पीच थेरपीची गरज असल्याने केटीएस रूग्णालयात आणण्यात आले. त्याच्या उपचारानंतर त्याला आश्रमशाळेत दाखल करण्यात येणार आहे, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हिंमत मेश्राम यांनी सांगितले आहे.