आदिवासींच्या आरक्षणावर गदा येऊ देणार नाही

By Admin | Updated: February 2, 2015 23:06 IST2015-02-02T23:06:56+5:302015-02-02T23:06:56+5:30

अलीकडे आपल्या जातीचा समावेश आदिवासींमध्ये करावा यासाठी काही लोक प्रयत्नशील आहेत. मात्र आदिवासींचे आरक्षण अबाधित ठेवून जर आरक्षण देण्यात येत असेल तर आमची कोणतीही हरकत नाही,

Adivasi reservation will not allow any kind of confusions | आदिवासींच्या आरक्षणावर गदा येऊ देणार नाही

आदिवासींच्या आरक्षणावर गदा येऊ देणार नाही

आदिवासी विकासमंत्र्यांची ग्वाही : कोयापुनेम गोंडवाना महाअधिवेशनाचे उद्घाटन
विजय मानकर - सालेकसा
अलीकडे आपल्या जातीचा समावेश आदिवासींमध्ये करावा यासाठी काही लोक प्रयत्नशील आहेत. मात्र आदिवासींचे आरक्षण अबाधित ठेवून जर आरक्षण देण्यात येत असेल तर आमची कोणतीही हरकत नाही, मात्र आदिवासींच्या आरक्षणातून इतर समाजाला वाटा दिला जात असेल तर हे आम्ही खपवून घेणार नाही आणि आदिवासींच्या आरक्षणावर गदा येऊ देणार नाही, अशी इशारावजा ग्वाही राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिली.
तालुक्यातील कचारगड यात्रेनिमित्त आयोजित राष्ट्रीय कोयापुनेम गोंडवाना महाअधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते, तर विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, आ.संजय पुराम, जि.प.समाजकल्याण सभापती कुसन घासले, भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल मंचावर विराजमान होते.
यावेळी पालकमंत्री बडोले यांनी दुर्गम भागाचा विकास करून आदिवासींना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगितले. यावेळी इतर पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या जमाकुडो शासकीय आदिवासी आश्रमशाळा येथील विद्यार्थिनी अनिता मडावी हिचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक आभार कचारगड देवस्थान समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी केले. पुढील तीन दिवस या परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
पाच वर्षात विविध सोयीसुविधा
कचारगडच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देऊन येत्या पाच वर्षात विविध विकास कामे करणार असल्याचे यावेळी पालकमंत्री बडोले यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला विविध राज्यातील आदिवासी समाजबांधवांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे पिवळा दुपट्टा आणि पिवळे शर्ट घातलेल्या श्रद्धाळू आदिवासींनी हा परिसर फुलून गेला आहे.
विविध भागातून आलेल्या आदिवासी समाजबांधवांनी नृत्यकला सादर करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. काही प्रांतातील नृत्य पथक व वाद्य पथकातील सदस्य धनेगाव ते कचारगडदरम्यान गुफेकडे जाताना ठिकठिकाणी थांबून आपल्या कलेचे प्रदर्शन करताना दिसत होते.
हा परिसर तीव्र नक्षलग्रस्त असल्यामुळे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनात धनेगाव ते कचारगडपर्यंत टप्याटप्यावर पोलिसांचा आणि अतिरिक्त सुरक्षा जवानांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: Adivasi reservation will not allow any kind of confusions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.