सर्व ठाण्यांनी राबवावा हा उपक्रम
By Admin | Updated: February 16, 2015 00:03 IST2015-02-16T00:03:43+5:302015-02-16T00:03:43+5:30
शहरातील व्यापारी संघटना, ग्रामपंचायत व नागरिकांच्या पुढाकारांनी आमगाव पोलीस ठाणे सीसीटीव्ही लावणारे पहिले पोलीस ठाणे असून, हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

सर्व ठाण्यांनी राबवावा हा उपक्रम
आमगाव : शहरातील व्यापारी संघटना, ग्रामपंचायत व नागरिकांच्या पुढाकारांनी आमगाव पोलीस ठाणे सीसीटीव्ही लावणारे पहिले पोलीस ठाणे असून, हा उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमाची प्रेरणा घेऊन पोलीस ठाण्यांनी हा उपक्रम राबवावा असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना यांनी केले. व्यापारी संघटना, ग्रामपंचायत व नागरिकांच्या सहकार्यामुळे आमगावातील चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमऱ्यांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून उप विभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे तसेच आमगाव, बनगाव, रिसामा या ग्रामपंचायतींचे संरपंच प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. मध्य् ाप्रदेशाच्या सीमेलगत व छत्तीसगढ पासून जवळच असलेल्या आमगाव तालुक्यात परराज्यातील गुन्हेगारांचा शिरकाव होतो. त्यामुळे चोऱ्या, दरोडे, घरफोड्या व मुलींची छेडखानी अशा प्रकरणांत सातत्याने वाढ होत आहे. या प्रकारांवर आळा घालण्यासाठी आमगाव पोलिसांच्या पुढाकाराने तसेच येथील व्यापारी व नागरिकांच्या सहभागातून येथील आंबेडकर चौक, मानकर चौक, गांधी चौक व कामठा चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून चहुबाजूला येणाऱ्या जाणाऱ्यांची चित्रफीत कॅमेराबद्ध होणार आहे. लावण्यात आलेले सर्व कॅमेरे डीजीटल विडीओ रेकॉर्डिंमध्ये जोडण्यात आले आहे.
या कॅमेरांमुळे परिसरावर २४ तास पोलीस ठाण्यांतून नजर ठेवली जाणार आहे. हे कॅमेरे इन्फ्रारेड असल्यामुळे रात्रीला अंधारातही व्हिडिओ रेकॉर्डिंग होऊ शकेल. कित्येकदा दुकानांत चोरी करण्याच्या घटनांमध्ये परप्रांतिय आरोपींचा समावेश असतो. आमगाव शहरापासून दीड किमी. अंतरावर मध्य प्रदेशची सीमा असल्यामुळे आमगावात चोरी करून आरोपी मध्य प्रदेशच्या हद्दीत निघून जात असल्यामुळे पोलिसांना त्यांना पकडण्यात अनेकदा यश मिळत नाही.
परंतु या सीसीटीव्ही कॅमेरांमुळे प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. येथे घडणारे अपघात, छेडछाड, रस्त्यावर अवैध पार्किंग, चोरी, घरफोडी या घटनांवर आळा घालण्यात हे कॅमेरे पोलिसांना मदत करणार आहेत. वाढत असलेल्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी व्यापारी संघटना व आमगाव, बनगाव, रिसामा, ग्रामपंचायतीचा पुढाकार व पोलीस निरीक्षक बी.डी. मडावी यांच्या पुढाकाराने येथील चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. यामुळे आमगाव पोलीस ठाणे हे जिल्ह्यातील पहिले सीसीटीव्ही कॅमेरे लावणारे पोलीस ठाणे ठरले आहे.
प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी देवरे यांनी मांडले. याप्रसंगी तालुक्यातील व्यापारी संघटनांचा पोलीस अधीक्षक मीना यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. संचालन सहायक पोलीस निरीक्षक विशाल राजे यांनी केले.
सिसीटीव्हीबाबत संपूर्ण माहिती सहायक पोलीस निरीक्षक शरद शेळके यांनी दिली. आभार पोलीस निरीक्षक मडावी यांनी मानले. यावेळी तालुक्यातील राईस मिल, किराणा, कपडा, हार्डवेअर, स्टेशनरी, मनिहारी, हॉटेल, बार, भांड्यांचे दुकान, इलेक्ट्रिक दुकानांचे संचालक, पोलीस पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)