गोंदिया : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अनेक विकासात्मक कामे करण्यात आली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून विकास कामांची गती वाढली आहे. पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येणारी कामे जनसामान्यांपर्यंत पोहचवावीत. तसेच त्यांच्या अडचणी जाणून त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांनी करावा असे प्रतिपादन माजी आ.राजेंद्र जैन यांनी केले.
आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथील राईस मिलच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व सदस्यांच्या सभेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ. मनोहर चंद्रिकापुरे, तालुकाध्यक्ष डॉ.अविनाश काशीवार, महिला तालुकाध्यक्ष रजनी गिऱ्हेपुंजे, दिनेश कोरे, आशिष येरणे उपस्थित होते. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे चांगले फळ मिळाले आहे. असेच परिश्रम आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत घ्यावे. तसेच सर्वांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन माजी.आ.राजेंद्र जैन यांनी केले. आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या जनहिताच्या कामाची माहिती पोहचवून पक्षाचा विस्तार करावा असे सांगितले. या वेळी माजी आ.जैन यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला. उपस्थित मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. निवडणुकीच्या अनुषंगाने यावेळी चाचपणी करण्यात आली. सभेला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.