महिनाभरातील कारवाई : सहा बालकांना केले पालकांच्या स्वाधीन
By Admin | Updated: February 11, 2016 02:04 IST2016-02-11T02:04:38+5:302016-02-11T02:04:38+5:30
बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांना त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने सुरू केलेल्या आॅपरेशन ...

महिनाभरातील कारवाई : सहा बालकांना केले पालकांच्या स्वाधीन
आॅपरेशन ‘स्माईल टू’मुळे बालकांना मिळाले मायबाप
गोंदिया : बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांना त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने सुरू केलेल्या आॅपरेशन ‘स्माईल टू’ मुळे बेपत्ता असलेल्या सहा बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या आई-वडीलांच्या स्वाधीन करण्यात आले.
बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांना शोधण्यासाठी पोलीस विभागाने आॅपरेशन मुस्कान राबवून जुलै महिन्यात ३१ बालके पकडले होते. या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाल्याने पोलीस विभागाने १ ते ३१ जानेवारीदरम्यान आॅपरेशन मुस्कान टू हा अभियान राबवून महिनाभरात ६ बालकांना पकडण्यात यश आले. त्या बालकांना त्यांच्या आई वडीलांच्या स्वाधीन करण्यात आले. सापडलेली सर्व बालके त्यांच्या मातापित्यांच्या सोबत आता राहू लागली आहेत. या सहा बालकांपैकी एक बालक परराज्यातील आहे.
जिल्हा पोलिसांनी आॅपरेशन मुस्कान अभियान राबवून १ ते ३१ जुलै या महिन्यात ३१ बालकांचा शोध घेतला आहे. यातील ७ मुले व १६ मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. तर ७ मुले एक मुलीला बालक समितीसमोर सादर करण्यात आले होते. अश्या एकूण ३१ बालकांना शोधण्यात पोलिसांना यश आले होते.
हरविलेल्या मुलामुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे आॅपरेशन मुस्कान प्रकल्प राबविण्यात आला. मात्र या अभियानाला नागरिकांनी पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य केले नाही.
मुलांच्या हातून भीक मागविण्यासाठी लहान बालकांचे अपहरण करून मोठ्या शहरात नेले जाते. त्यांना मारहाण करून त्यांच्या हातून भीक मागविणे, तर काहींना वाममार्गाकडे वळविले जाते. मुलींना देह व्यवसायाच्या कामात लावण्यासाठी त्यांचे अपहरण केले जाते.
१८ वर्षाखाली बेपत्ता किंवा अपहरणाचे प्रमाण पाहून राज्यशासनाने या बालकांना शोधून त्यांच्या आईवडीलांच्या हवाली करण्यासाठी आॅपरेशन मुस्कान टू ही मोहीम राबविली. बालकांना शोधण्यासाठी आॅपरेशन मुस्कान अभियानासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी व दोन कर्मचारी लावले होते.
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानके, रूग्णालय, उद्याने, चौक, रेल्वेस्थानक व सार्वजनिक ठिकाणी फिरस्ते किंवा भीक मागणाऱ्या मुलांशी संपर्क अभियान राबविला आहे. त्या बालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेला स्वयंसेवी संस्थाची मदत मिळाली नाही हे विशेष. जुलै महिन्यात या अभियानाला उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे शासनाने पुन्हा हे अभियान राबविले आहे. (तालुका प्रतिनिधी)
सामाजिक संघटना कधी जागणार?
गोंदियात समाजेसेवी संस्था शेकडोच्या घरात आहेत. मात्र आॅपरेशन मुस्कानच्या कामात गोंदिया जिल्ह्यातील एकाही सामाजिक संघटनेने मदत केली नाही. महत्वाच्या कामात सहकार्य न करणाऱ्या संस्था मग कोणत्या कामाच्या आहेत? अशा प्रतिक्रिया पोलीस विभागात उमटत आहेत.
चार मुले व दोन मुलींचा समावेश
आॅपरेशन मुस्कान टू या अभियानात जानेवारी महिन्यात शोध घेतलेल्या बालकांमध्ये गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत एक मुलगा, रामनगर एक मुलगा, रावणवाडी दोन मुली, डुग्गीपार एक मुलगा व सालेकसा एक मुलगा अश्या सहा जणांचा समावेश आहे. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत पकडण्यात आलेल्या दोन मुलींपैकी एक मुलगी परराज्यातील म्हणजे मध्यप्रदेशातील होती.