चान्ना आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी
By Admin | Updated: October 9, 2014 23:04 IST2014-10-09T23:04:28+5:302014-10-09T23:04:28+5:30
सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे चान्ना/बाक्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सध्यातरी हाणामारीचा आखाडा बनले आहे. संशयी वृत्तीने कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच

चान्ना आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी
बोंडगावदेवी : सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे चान्ना/बाक्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सध्यातरी हाणामारीचा आखाडा बनले आहे. संशयी वृत्तीने कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच मारपीट करण्याइतपत द्वेष निर्माण झाल्याने गावात हा चर्चेचा विषय झाला आहे.
कमालीची हातापायी होऊनसुध्दा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या वरिष्ठांनी निव्वळ बघ्याची भूमिका घेऊन मौन पाळण्यातच स्वत:ला धन्य मानले. आरोग्य केंद्राच्या परिसरात झालेल्या हाणामारीच्या प्रकाराची इतर कर्मचारी मात्र दहशतीखाली वावरत असल्याचे दिसून येत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राचा तसेच चान्ना गावाचा फेरफटका मारला असता मिळालेल्या माहितीनुसार, असे प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेली एक आरोग्य सेविका प्राथमिक आरोग्य केंद्रातील निवासस्थानात राहते. तर दुसरा एक शिपाई कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील निवासस्थानात कुटूंबासह राहत होता. ती आरोग्य सेविका सुध्दा आपल्या संपूर्ण कुटूंबासहित निवासस्थानात कायमस्वरूपी राहात आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असलेली ती महिला वेळोवेळी आपल्या निवासस्थानावरून येऊन आंतररुग्णाची तपासणी करायची. शिपाई असलेला कर्मचारी सुध्दा प्राथमिक आरोग्य केंद्रात आपले कर्तव्य बजावत होता असे सांगण्यात येते. शिपायांच्या कुटूंबाला कोणता राग अनावर झाला ते कळले नाही. पाहता-पाहता दोन कर्मचाऱ्यांच्या कुटूंबात भांडणाचा उद्रेक झाला. शाब्दिक भांडणाने रौद्र रुप धारण केले. भ्रमणध्वनीच्या माध्यमातून एका कर्मचाऱ्याने आपल्या नातेवाईकांना त्वरीत बोलावले. त्या नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात कहरच केला. दोन कर्मचाऱ्यांच्या कुटूंबात सिनेस्टाईल हाणामारी झाली. मारहाण करेपर्यंत भांडण विकोपाला गेला. आरोग्य केंद्रातील इतर कर्मचारी सुध्दा घाबरले. आपल्या नातेवाईकाला बोलावून हाणामारीचे प्रकरण होईपर्यंत मजल गाठण्यात आली. त्या दोन कुटूंबात त्या दिवशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर काही कर्मचाऱ्यांनी चान्ना येथील प्रतिष्ठीत नागरिकांना बोलावून एका कर्मचाऱ्यांच्या कुटूंबाला सुरक्षितस्थळी रात्रीच बाहेरगावी हलविण्यात आले. बाहेरून आलेल्या नातेवाईकांनी त्यांचा पाठलाग केल्याचे सांगण्यात येते. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचला तरी सुध्दा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वरिष्ठांनी यात दखल घेतली नसल्याचे समजते. दोन कर्मचाऱ्यांच्या कुटूंबात झालेल्या हाणामारीने एक कर्मचारी वैद्यीय रजेवर गेल्याचे समजते.
दुसरा कर्मचारी गावात एका खाजगी घरामध्ये राहण्यासाठी गेला असल्याचे सांगण्यात आले. दोन कर्मचाऱ्यांमधील भांडणाची परिणती एकदम हातापायीवर गेल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रशासकीय व्यवस्था किती ढिसाळ झाली आहे हेच वरिल प्रकरणावरून दिसून येत आहे. (वार्ताहर)