रेती माफियांवरील कारवाई थंडबस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:13 IST2017-09-01T01:13:26+5:302017-09-01T01:13:41+5:30

रेती माफियांवरील कारवाई थंडबस्त्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
सौंदड : सडक-अर्जुनी तालुक्यातील चुलबंद नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध खनन होत आहे. याची तक्रार तहसीलदारांकडे करण्यात आली होती. परंतु यानंतरही महसूल विभागाकडून कार्यवाही केली जात नसल्याचे चित्र आहे. केवळ रेती घाटाचे मोजमाप करुन कारवाई केल्याचा देखावा केला जात असल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चेला उधान आले आहे.
चुलबंद नदी पात्रात अवैध खनन करणाºया चोरांवर रितसर कारवाई व्हावी व गौण खनीज चोरीवर आळा बसावा, यासाठी १३ जुलै रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने तहसीलदार व्ही.एम. परळीकर सदर घाटावर १४ जुलै रोजी मोजणी करण्यासाठी गेले. त्यांच्यासह दोन कोतवाल, नायब तहसीलदार मेश्राम व पीडब्ल्यूडीचे एक अधिकारी होते.
घाटाची मोजणी करून संबंधित घाट मालकाकडून अतिरिक्त उत्खननाचे दंड वसूल करण्यात येणार होता. परंतु जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही कसलीही कारवाई करण्यात आली नाही.
या याबाबत सदर प्रतिनिधीने विचारा केली असता, आठवडाभरात कारवाई केली जाईल, असे तहसीलदारांनी सांगितले होते. दोन महिने लोटूनही कारवाई थंडबस्त्यातच आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन अवैध गौण खनिज खननाला आळा घालण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.