न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १८ जणांवर कारवाई
By Admin | Updated: November 16, 2014 22:53 IST2014-11-16T22:53:27+5:302014-11-16T22:53:27+5:30
तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्रामगराडा येथे विनापरवाना नौटंकी नाटक करून न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन व धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात नौटंकी

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १८ जणांवर कारवाई
इंदौरा/बु. : तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्रामगराडा येथे विनापरवाना नौटंकी नाटक करून न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन व धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात नौटंकी नाटक करणाऱ्यांसह लाऊडस्पिकर चालक व वाद्य वादकांसह १८ जणांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांना अटक केली. यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
सध्या तिरोडा तालुक्यात सर्वत्र मंडई उत्सव सुरू आहे. या उत्सवात नौटंकी नाटकांचे आयोजन करण्यात येते. गराडा येथे २५ आॅक्टोबर रोजी गायत्री मंदिरासमोर नौटंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या नाटकादरम्यान काही कलांवर प्रेक्षक दारू पिवून समाजविघातक वागणूक करीत असल्याने, ही नौटंकी नाटक या ठिकाणी न करता दुसऱ्या ठिकाणी करावे, अशी विनंती काही गावकऱ्यांनी आयोजकांना केली होती. परंतु विनंती न मानल्याने गावकऱ्यांनी तिरोडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था रहावी म्हणून कलम २४९ नुसार येथे नाटक करू नये, अशी नोटीस बजावली.
मात्र त्यानंतरही नोटीसचे उल्लंघन करून रात्रभर मोठ्या आवाजात लाऊडस्पिकर लावून नौटंकी नाटक करण्यात आले. त्यामुळे आजूबाजूच्या आजारी व्यक्तींना त्रास झाला. गायत्री मंदिरासमोरच हे नाटक असल्याने लोकांच्या धार्मिक भावनासुद्धा दुखावल्या. शिवाय रात्री १० वाजतानंतर लाऊडस्पिकर वाजवू नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले.
गराडा येथील रहिवासी सुनील बारापात्रे यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम १८८, २९८ अन्वये गुन्हा दाखल केला. यात देवदास बावणकर, हेमराज गभणे, सहादेव उके, कृष्णकुमार आमटे, प्रमोद चौधरी यांच्यासह लाऊडस्पिकर चालक व नाटकातील वाद्य वादक अशा एकूण १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यांना अटक करून न्यायालयातही उभे करण्यात आले. मागील पाच वर्षांच्या कालावधीत अशा प्रकार तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भागात घडला नव्हता. (वार्ताहर)