नववर्षात एसीबीने खाते उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:51 IST2021-02-05T07:51:01+5:302021-02-05T07:51:01+5:30
गोंदिया : खर्चपाणीच्या नावावर लाच मागणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी कार्यरत लाच लुचपत प्रतिबंधक विभागासाठी (एसीबी) नववर्ष भरभराटीचे लागल्याचे दिसत आहे. ...

नववर्षात एसीबीने खाते उघडले
गोंदिया : खर्चपाणीच्या नावावर लाच मागणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी कार्यरत लाच लुचपत प्रतिबंधक विभागासाठी (एसीबी) नववर्ष भरभराटीचे लागल्याचे दिसत आहे. कारण, नववर्षातील २५ दिवसांतच एसीबीने दोन कारवाया केल्या असून, यामध्ये तीन आरोपींना अटक केली आहे. एकंदर नववर्षाच्या सुरुवातीलाच एसीबीने खाते उघडल्याचे दिसून येत आहे.
काम करून देण्यासाठी खर्चपाणी व मिठाईच्या नावावर पैशांची मागणी करणे हा प्रकार आजघडीला शासकीय काय खासगी कार्यालयांतही सुरू आहे. लहान-सहान असो की मोठे काम प्रत्येकालाचा पैशांचा चस्का लागला असून, गरजूकडून पैसे उकळ्याच्या या प्रकारालाच लाचखोरी म्हटले जाते, तर पैसे मागणाऱ्यांना लाचखोर म्हटले जाते. विशेष म्हणजे, पैशांची देवाण-घेवाण करून कामे करवून घेणे ही आजघडीला समाजातील परंपराच बनली आहे. मात्र यानंतरही काहींना जास्तीचे पैसे कमाविण्याची हाव असते. अशा या लाचखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. दरवर्षी एसीबीकडून अशा लाचखोरांवर कारवाया केल्या जात असूनही लाचखोरीचे हे प्रकार काही संपलेले नसल्याचे दिसत आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे, सन २०२१ मध्येही लाचखोरीचे हे प्रकार काही थांबले नसल्याने या नववर्षाच्या सुरुवातीलाच एसीबीने दोन कारवायांत तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये एक कारवाई पोलीस विभागातील असून, दुसरी कारवाई महिला व बाल कल्याण विभागातील आहे. या दोन्ही प्रकरणांत एसीबीने तीन जणांना अटक केली असून, यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नववर्षातील या २५ दिवसांच्या कालावधीतच एसीबीने लाचखोरांचे दोन प्रकरण उघडकीस आणले असून, यावरून हे वर्ष एसीबीला चांगलेच भरभराटीचे लागले असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
---------------------------
बाप रे... कोरोना काळात दहा कारवाया
कोरोना या महामारीने अवघा जागाला हेलावून सोडले आहे. कोरोना काळात कित्येकांच्या हातचे काम सुटले व त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचे वांदे झाल्याचेही दिसले. मात्र कोरोना काळातच खरी माणुसकीही दिसून आली व माणूसच माणसासाठी धाऊन आल्याचेही दिसले. मात्र अशा या कठीण वेळातही समाजभान हरपून बसलेल्या लाचखोरांना काहीच वाटले नाही व त्यांनी लाचेची मागणी करणे सोडले नसल्याचेही बघावयास मिळाले. अशा १३ जणांना एसीबीने जणका दिला आहे. २१ मार्च २०२० ते २२ नोव्हेंबर २०२० या कोरोना काळातही एसीबीने दहा कारवाया केल्या असून, त्यात १३ जणांना अटक केली आहे.