सुरक्षा भिंतीअभावी उत्तर बुनियादी शाळेत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
By Admin | Updated: February 18, 2015 01:45 IST2015-02-18T01:45:24+5:302015-02-18T01:45:24+5:30
स्थानिक जिल्हा परिषद उत्तर बुनियादी शाळा शहराच्या मुख्य रस्त्याच्या कडेला असून इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.

सुरक्षा भिंतीअभावी उत्तर बुनियादी शाळेत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
तिरोडा : स्थानिक जिल्हा परिषद उत्तर बुनियादी शाळा शहराच्या मुख्य रस्त्याच्या कडेला असून इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. येथील शैक्षणिक गुणवत्ता साधारणत: चांगली असल्यामुळेच शहरातील खासगी शाळा व कॉन्व्हेंटच्या स्पर्धेत अजूनही टिकून आहे. एवढेच नव्हे तर विद्यार्थी संख्याही भरपूर आहे. परंतु सुरक्षा भिंत नसल्याने विद्यार्थी खेळता-खेळता मुख्य रस्त्यावर येतात व अपघात होण्याची शक्यता असते.
अदानी पॉवर प्लांटच्या वतीने सुंदर व सुसज्ज अशी इमारत या शाळेला बनवून देण्यात आली आहे. या शाळेकडे चांगली शाळा म्हणूनच बघितल्या जात आहे. परंतु शाळेला सुरक्षा भिंत नसल्याने लहान-लहान विद्यार्थ्यांचे पालक चिंता व्यक्त करताना दिसतात.
शाळेला सुरक्षा भिंत निर्माण झाल्यास एक सुंदर बगीचा निर्माण करता येईल. विद्यार्थ्यांच्या हस्ते कार्यानुभव विषयांतर्गत पालेभाज्या, फुलझाडांची लागवड करण्यात येवून विद्यार्थ्यांच्या गुणत्तेत निश्चितच वाढ होईल. हे सर्व करण्यासाठी येथील शिक्षक व मुख्याध्यापक सकारात्मक आहेत, मात्र त्यासाठी सुरक्षा भिंतीची गरज आहे.
शाळेत भिंती अभावी वृक्षारोपण केले तरी एकही झाड जगू शकत नाही. कित्येकदा शालेय वेळेतसुध्दा या परिसरात फेरीवाले, दुपारी मुले फिरताना दिसून येतात. रस्त्याच्या लागूनच पान-टपऱ्या असल्याने मुले तिकडे जातात. तंबाखू-गुटखा यासारख्या सवई विद्यार्थ्यांना लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे व जिल्हा परिषदेच्या वतीने किंवा अदानी प्लांटच्या वतीने शक्य तितक्या लवकर सुरक्षा भिंत शाळेला निर्माण करून द्यावी, अशी विद्यार्थ्यांना पालकांची मागणी आहे. (वार्ताहर)