लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यातील महाविद्यालये सुरु करण्यात यावीत, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने मंगळवारी राज्यव्यापी ‘महाविद्यालय उघडा’ आंदोलन येथील धोटे बंधू महाविद्यालय व नमाद महाविद्यालयासमोर करण्यात आले. यावेळी शासनाच्या नावे दोन्ही महाविद्यालयांच्या प्राचार्यांना ‘अभाविप’कडून निवेदन देण्यात आले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या ११ महिन्यांपासून राज्यातील महाविद्यालये बंद आहेत. कोविड परिस्थितीत सुधारणा होत असताना हळूहळू दारुची दुकाने, मॉल, सिनेमागृह, परिवहन सेवा व राज्यातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. परंतु, महाविद्यालये अद्यापही बंदच आहेत. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होेत आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आभासी पद्धतीचा उपयोग होत असला, तरी यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या सर्व बाबींकडे शासनाचे लक्ष द्यावे व महाविद्यालयीन शिक्षण प्रत्यक्ष महाविद्यालयातून देणे सुरु करावे, यासाठी ‘अभाविप’तर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. गोंदिया येथे धोटे बंधू महाविद्यालय व नमाद महाविद्यालयासमोर आंदोलन करुन दोन्ही महाविद्यालयांच्या प्राचार्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ‘अभाविप’चे नगरमंत्री अतुल कावडे, सहमंत्री गौरव वानखेडे, कार्तिक नागपुरे, महाविद्यालय प्रमुख रवींद्र मस्करे, सोशल मीडिया प्रमुख सोमेश तुपटे, तंत्रशिक्षण विद्यार्थी कार्यप्रमुख अनिकेत तुरकर, गौरव नागपुरे, शुभम नेवारे, नीरज शुक्ला, अमोल मेश्राम, ऋतिक नागपुरे, विलास वाहारे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.