अपहरणातील आरोपीला अटक
By Admin | Updated: November 29, 2014 23:22 IST2014-11-29T23:22:19+5:302014-11-29T23:22:19+5:30
एक अल्पवयीन मुलगी अरूणनगर रेल्वे स्थानकावर असताना तिच्या आई-वडीलांच्या ताब्यातून तिचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अर्जुनी/मोरगाव पोलिसांनी पश्चिम बंगाल राज्यातून अटक केली.

अपहरणातील आरोपीला अटक
पीडित मुलगी अल्पवयीन : पश्चिम बंगालमधून घेतले ताब्यात
अर्जुनी/मोरगाव : एक अल्पवयीन मुलगी अरूणनगर रेल्वे स्थानकावर असताना तिच्या आई-वडीलांच्या ताब्यातून तिचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अर्जुनी/मोरगाव पोलिसांनी पश्चिम बंगाल राज्यातून अटक केली. पीडित मुलगी अरुणनगर येथील असून ती अवघी १४ वर्षांची आहे.
प्राप्त माहितीनुसार, गेल्या १७ नोव्हेंबर रोजी सकाळी सदर मुलगी रेल्वे स्थानकावर गेली होती. यावेळी तिला आरोपी महेंद्र मुकुंद बाला (२७) रा.वडसा/आमगाव जि. गडचिरोली याने पळवून नेले. याची तक्रार अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यात १९ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, पोलीस नायक पुण्यप्रेडीवार, शिपाई मुळे यांनी केला.
आरोपीचे मूळ गाव छत्तीसगड राज्याच्या कांकेर जिल्ह्यातील पाऊलकोट आहे. तो आपल्या मूळ गावी गेला असेल असे समजून पोलीस पथक पारूलकोट येथे गेले. मात्र तिथे आरोपी आढळला नाही. पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. आरोपीचे मोबाईल टॉवर लोकेशन घेतले. त्या आधारावर पोलीस पश्चिम बंगाल राज्यात पोहोचले. तिथे तीन जिल्ह्यात आरोपी व पिडीत मुलीचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाही. २५ नोव्हेंबर रोजी पोलिसांना माहिती मिळाली. त्या आधारावर रात्री साऊथ २४, परगना जिल्ह्याच्या रंगोनबिडीया या गावातून पोलिसांनी आरोपी व पिडीत मुलीला अटक केली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा पिडीत मुलीचा सख्खा मावसा आहे. पिडीतेशी लैगिंक अत्याचार करण्याच्या उद्देशाने आरोपीने कांकेर व नंतर रायपूर येथे मुक्काम केला. त्यानंतर पश्चिम बंगाल राज्यात पळवून नेले. आरोपीला शनिवारी (दि.२९) ला गोंदिया सत्र न्यायालय येथे नेण्यात आले. या संंपूर्ण तपासात जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, उपअधीक्षक गजानन राजमाने व पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील पोलीस निरीक्षक रन्नावरे यांचे मार्गदर्शन मिळाल्याची माहिती तपास अधिकारी राजेश गज्जल यांनी दिली.
पोलिसांनी भादंविच्या कलम ३६३ गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपीविरूध्द पोलिसांनी कलम ३६६, ३७६ भादंवि तसेच ४, ६, ८, १० बाल लैगिंक अत्याचार अधिनियम २०१२ चे कलम वाढविण्यात आले. पुढील तपास सपोनि राजेश गज्जल हे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)