आरतीची हत्या नसून आत्महत्या!

By Admin | Updated: August 29, 2015 01:48 IST2015-08-29T01:48:18+5:302015-08-29T01:48:18+5:30

सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सोनारटोला येथील आरती रवींद्र बारसे या तरूणीचा जळालेला मृतदेह गेल्या १७ आॅगस्ट रोजी तिच्या घरासमोरील विहीरीत आढळल्याने ....

Aarti is murdered, not suicide! | आरतीची हत्या नसून आत्महत्या!

आरतीची हत्या नसून आत्महत्या!

सोनारटोला गूढ मृत्यूप्रकरण : एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराला अटक
गोंदिया : सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सोनारटोला येथील आरती रवींद्र बारसे या तरूणीचा जळालेला मृतदेह गेल्या १७ आॅगस्ट रोजी तिच्या घरासमोरील विहीरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. घरात एकटी असताना तिला मध्यरात्रीच्या सुमारास तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाने तिला जाळून विहिरीत ढकलल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात होता. मात्र पोलिसांनी १० दिवसानंतर ती आत्महत्या असल्याचे निश्चित करून तिच्या प्रियकराला अटक केली.
आरतीच्या आत्महत्येसाठी गावातील तंटामुक्त समितीचा अध्यक्ष असलेला योगराज ऊर्फ मुन्ना हेमराज चकोले (२८) हाच कारणीभूत असल्याचा ठपका अखेर पोलिसांनी ठेवून त्याच्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सहा महिन्यापूर्वी आरतीला योगराजने प्रेमाचा प्रस्ताव दिला होता. परंतू तिने त्याला प्रतिसाद दिला नाही. नेहमी तिच्या मागे-मागे जाऊन तिला तो त्रास द्यायचा. या प्रकरणाची तक्रार तिने आई वडीलांकडे केली. आईवडीलांनी या संदर्भात सालेकसा पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल न करता तंटामुक्त समितीतून समझोता केला होता. शंभर रूपयाच्या स्टॅम्पवर योगराजने मी आता यानंतर आरतीला त्रास देणार नाही असे लिहूनही दिले होते.
दरम्यान, आरतीचा मृतदेह विहिरीत सापडल्यानंतर तिची आत्महत्या नाही तर तिची योगराज व त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून हत्या केली, असा घरच्यांचा आरोप होता. पोलिसांनी सुरूवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. परंतु प्रकरण चिघळल्याने पोलिसांनी चौकशी सुरू केली. या प्रकरणात आरतीने तंटामुक्त अध्यक्ष योगराज ऊर्फ मुन्ना हेमराज चकोले (२८) याच्या जाचाला कंटाळून स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून टाकून घेतले व त्रास असह्य झाल्यामुळे घरासमोरील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली, असा अंदाज पोलिसांनी बांधला. २७ नोव्हेंबर २०१४ ते १७ आॅगस्ट २०१५ दरम्यान तिचा छळ त्याने केल्यामुळे त्याच्याविरूध्द भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडे आता स्टँम्प पेपर आला कुठून?
योगराज ऊर्फ मुन्ना चकोले हा आरतीवर एकतर्फी प्रेम करीत होता. ती त्याच्या प्रेमाला नकार देत होती त्यामुळे तो तिचा छळ करीत होता. सहा महिन्यांपूर्वी सालेकसा पोलिसांच्या साक्षीने समझोता करण्यात आला. या समझोत्यात शंभर रूपयांच्या स्टॅम्पवर मुन्नाने आरतीला त्रास देणार नाही असे लिहून दिले होते. तो मुद्रांक पोलीस नायक विनायक बेदरकर यांच्याकडे होता. परंतु या प्रकरणानंतर बेदरकरने घुमजाव करून तो स्टॅम्प मुलीच्या नातेवाईकाकडे आहे, असे सांगितले होते. परंतु तो स्टॅम्प आता पोलिसांकडे आलाच कसा असा प्रश्न नातेवाईक करीत आहेत. आरोपीला सहकार्य करणाऱ्या बेदरकरला निलंबित करण्याची मागणी होत आहे.
- तर दाखल होईल खुनाचा गुन्हा
प्रकरण शांत करण्यासाठी सालेकसा पोलिसांनी स्टॅम्प पेपरचा आधार घेत आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरतीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी मृत्यूचे कारण नमूद न करता व्हिसेरा रिपोर्टवर अहवाल अवलंबून ठेवल्यामुळे व्हिसेरा रिपोर्ट आल्यानंतर तिचा जळून मृत्यू जर झाला असेल तर या प्रकरणात खुनाचा गुन्हाही दाखल होऊ शकतो.

 

Web Title: Aarti is murdered, not suicide!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.