यांत्रिकांची ‘आॅन ड्युटी’ पार्टी ?
By Admin | Updated: March 2, 2015 01:31 IST2015-03-02T01:31:56+5:302015-03-02T01:31:56+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या तिरोडा आगारातील यांत्रिक ‘आॅन ड्युटी’ पार्टी साजरी करण्यासाठी रविवार (दि.१) बोदलकसा येथे गेले.

यांत्रिकांची ‘आॅन ड्युटी’ पार्टी ?
गोंदिया : राज्य परिवहन महामंडळाच्या तिरोडा आगारातील यांत्रिक ‘आॅन ड्युटी’ पार्टी साजरी करण्यासाठी रविवार (दि.१) बोदलकसा येथे गेले. दुपारी १२.३० वाजतापासून त्यांची पार्टी सायंकाळपर्यंत चांगलीच रंगल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तिरोडा एसटी आगारातील यांत्रिकी कार्यशाळेत अनेक गाड्यांच्या दुरूस्तीचे कार्य प्रलंबित असतानाही सदर यांत्रिकांनी ते काम सोडून पार्टीत उपस्थित होणे आवश्यक समजले. या प्रकारामुळे स्वच्छता अभियान सुरू असतानाही बसेसची साफसफाई होवू शकली नाही. तसेच रविवार आठवडी बाजाराचा दिवस असतानाही तिरोडा आगाराच्या बसेस दुपारी विलंबाने धावल्या व याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला.
तिरोडा आगाराच्या यांत्रिकी कार्यशाळेत एकूण २४ कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी चार कर्मचाऱ्यांवर बसगाड्या धुण्याची जबाबदारी आहे. उर्वरित २० यांत्रिकी कर्मचाऱ्यांमध्ये दोन इलेक्ट्रीशियन, एक टायर फिटर, एक बॉडी फिटर, दोन हेड मेकॅनिक, एक वाहन परीक्षक व उर्वरित दुरूस्ती करणारे आहेत. यातील १० कर्मचारी सकाळ पाळीत तर १० कर्मचारी रात्र पाळीत कामावर असतात. मात्र रविवारी तिरोडा आगाराच्या कार्यशाळेत केवळ एक इलेक्ट्रीशियन व एक सहायक असे दोन कर्मचारी कार्यरत होते. उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांनी बोदलकसा जलाशयावर ‘आॅन ड्युटी’ पार्टी साजरी करण्यातच धन्यता मानली.
एसटी महामंडळाच्या नियमानुसार, कोणत्याही कर्मचाऱ्याला अर्धा दिवस सुट्टी घेण्याची तरतूद नाही. रजा घ्यायचीच आहे तर पूर्ण दिवसाची रजा घ्यावी लागते. त्यासाठी रीतसर अर्ज देवून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ती मंजूर करून घ्यावी लागते. मात्र सदर यांत्रिकांनी सुट्टीची अशी कसलीही प्रक्रिया पूर्ण न करता पार्टीचा आनंद घेण्यासाठी एसटी महामंडळाच्या नियमांनाच तिलांजली दिल्याचा प्रकार घडला. (प्रतिनिधी)