आमगाव नगरी झाली बेवारस
By Admin | Updated: March 7, 2016 01:34 IST2016-03-07T01:34:31+5:302016-03-07T01:34:31+5:30
आमगावला नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा यासाठी टाकण्यात आलेली रिट याचिका (२०/२०१५) उच्च न्यायालय नागपूर खंडपिठाने रद्दबातल केली आहे.

आमगाव नगरी झाली बेवारस
रिट याचिका फेटाळली : ना ग्रामपंचायत, ना नगर पंचायत
गोंदिया : आमगावला नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा यासाठी टाकण्यात आलेली रिट याचिका (२०/२०१५) उच्च न्यायालय नागपूर खंडपिठाने रद्दबातल केली आहे. यासह महाराष्ट्र शासनाची १२ फेब्रुवारी २०१५ ची अधिसूचनाही रद्दबातल करण्यात आली आहे. त्यामुळे सदर आदेशाच्या अनुषंगाने आजच्या स्थितीत आमगाव नगर पंचायत किंवा नगर परिषद आहे याचे चित्र स्पष्ट होत नाही. तर सदर आदेशामुळे प्रशासकांची सेवा समाप्त झाल्याचे निर्दशनास येते. त्यामुळे आमगाव नगरी आजघडीला बेवारस दिसत आहे.
शासनाने जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा, देवरी, गोरेगाव, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव या सहा तालुकास्थळांचा दर्जा वाढ करून त्यांना नगर पंचायतचा दर्जा दिला होता. मात्र आमगावातील लोकसंख्येच्या दृष्टीने नगर पंचायत ऐवजी नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा या मागणीला घेऊन पद्मावती चुटे यांनी महाराष्ट्र शासनाविरोधात रिट याचिका टाकली होती.
मात्र उच्च न्यायालय खंडपिठ नागपूर यांनी १० फेब्रुवारी रोजी ही याचिका रद्दबातल केली. तसेच महाराष्ट्र शासनाची १२ फेब्रुवारी २०१५ रोजीची नगर पंचायतबाबतची अधिसूचना रद्द करीत नगर पंचायत किंवा नगर परिषद बनविने हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील नसून राज्य शासनाने याबाबत योग्य निर्णय घेण्याचा निर्णय दिला आहे.
सदर आदेशाच्या अनुषंगाने आजच्या स्थितीत आमगाव नगर पंचायत किंवा नगर परिषद आहे याचे चित्र स्पष्ट होत नाही. तसेच आदेशामुळे प्रशासकांची सेवा समाप्त झाल्याचेही म्हणणे वावगे ठरणार नाही. असे झाल्याने नगर पंचायतीचे चाललेले कारभार जसे विधि प्रमाणपत्र देणे, बांधकाम परवानगी देणे, मालमत्ता कराची वसुली, स्वच्छता विषयक बाबी, पाणी पुरवठा, पथदिवे इत्याही नागरी सुविधा खोळबंत असून नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.
तसेच आता नागरिकांना आपल्या समस्या कोणाकडे नोंदवाव्या याबाबत असमंजस स्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे आमगाव नगरी आजघडीला बेवारस झाली असेच म्हणता येईल. याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. (शहर प्रतिनिधी)