लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थिनीवरच शिक्षकाने वाईट नजर ठेवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तिरोडा शहरातील नामवंत हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला असून, त्या शिक्षकावर सोमवारी (दि.२०) रात्री १ वाजता तिरोडा पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सुनील आत्माराम शेंडे (५२, रा. गांधी वॉर्ड, तिरोडा) असे आरोपीचे नाव आहे.
सुनील शेंडे हा तिरोडा शहरातील एका नामवंत शाळेत एनसीसी शिक्षक पदावर कार्यरत असून, दहाव्या वर्गातील १५ वर्षीय पीडित मुलीशी अश्लील चाळे करायचा. मुलगी शाळेत गेल्यावर आरोपी शेंडे तिला आपल्या ऑफिसमध्ये बोलवायचा. गुरुवारी (दि.१६) सकाळी ८.३० वाजता शाळेत गेली असता आरोपीने तिला आपल्या ऑफिसमध्ये बोलावून तिचा हात पकडला. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता ऑफिसमध्ये तिचा उजवा हात पकडला. त्याच्या हाताला झटका देत ती मुलगी ऑफिसच्या बाहेर गेली.
संधी मिळेल त्या ठिकाणी तो तिला पकडून तिच्याशी अश्लील चाळे करायचा. पीडित मुलीच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम ७४, ७५ (१) (१) सहकलम ८, १२ बाल लैंगिक अत्याचार अधिनयमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास महिला पोलिस उपनिरीक्षक दिव्या बरड करीत आहेत.
कुणाला सांगू नको अन्यथा याद राख त्या १५ वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे केल्यानंतर या प्रकाराची वाच्यता कुणाकडे करू नकोस, घरच्यांना काही सांगू नकोस अन्यथा याद राख. याचा भुर्दंड तुला सहन करावा लागेल अशी धमकी देत असल्याचे मुलीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
विनयभंगासाठी शनिवारी, रविवारी सराव ? आरोपी शिक्षक सुनील शेंडे हा एनसीसीचा सराव करण्याच्या नावावर दर शनिवारी व रविवारी विद्यार्थ्यांना बोलवत होता. या सरावाच्या नावावर आरोपी त्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करायचा. विनयभंग व अश्लील चाळे करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही एनसीसीचा सराव आयोजित करायचा का? असा सवाल उपस्थित होत आहे.
चार दिवसांपासून करीत होता अश्लील चाळे १६ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता ते १९ जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजता दरम्यान या चार दिवस आरोपीने पीडित मुलीशी अश्लील चाळे केले. तिचा विरोध असतानाही आरोपी तिला वारंवार शाळेच्या ऑफिसमध्ये बोलावून आलमारीतील फाइल काढायला सांगण्याच्या बहाण्याने छेडायचा. या घटनेसंदर्भात चौथ्या दिवशी तिरोडा पोलिसांत तक्रार करण्यात आली.