महागाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला केले जेरबंद
By अंकुश गुंडावार | Updated: December 12, 2025 20:33 IST2025-12-12T20:32:55+5:302025-12-12T20:33:46+5:30
Gondia : अस्वलाला डॉट मारुन पिंजऱ्यात जेरबंद केले. यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गेल्या ७-८ दिवसांपासून महागाव परिसरात अस्वलाचे अनेक गावकऱ्यांना दर्शन झाले.

A bear that caused a stir in the Mahagaon area was captured.
महागाव : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव परिसरात मागील आठ दिवसांपासून अस्वलाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. यामुळे शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. शुक्रवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने
अस्वलाला डॉट मारुन पिंजऱ्यात जेरबंद केले. यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गेल्या ७-८ दिवसांपासून महागाव परिसरात अस्वलाचे अनेक गावकऱ्यांना दर्शन झाले. ५ डिसेंबर रोजी अस्वल आढळल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तिला जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले होते. परंतु ती पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच परिसरात आढळून आली. हा सर्व घटनाक्रम पाहता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात रात्रीची गस्त लावली. तसेच गावकऱ्यांना सर्तक राहण्यासाठी गावात दवंडी दिली. शुक्रवारी (दि.१२) दुपारी १ च्या दरम्यान छगन साखरे व अनिल नाकाडे या गावकऱ्यांना अस्वल आढळली. त्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली.
माहिती मिळताच वन परीक्षेत्र अधिकारी प्रवीण केळवतकर व त्यांची टीम घटनास्थळी पोहचली. सर्व परिसराची पाहणी करून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने अस्वलाला डॉट मारुन पकडण्यासाठी विशेष पथक गोंदिया येथून बोलविले. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गोरे महागाव, डॉ. हर्षल बोकडे बाराभाटी हे उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अस्वलाला डॉट मारण्यात आले. हा सर्व घटनाक्रम पाहण्यासाठी गावातील लोकांची गर्दी झाली होती. गनमॅन अमोल चौबे यांनी अस्वलाला सुरक्षित डॉट मारुन तिला पिंजऱ्यात जेरबंद करुन नवेगावबांध वनविभाग येथे नेण्यात आले.