प्रसूतीसाठी येणाऱ्या ९० टक्के महिलांना ‘अ‍ॅनेमिया’

By Admin | Updated: May 28, 2015 01:23 IST2015-05-28T01:23:02+5:302015-05-28T01:23:02+5:30

आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आरोग्याविषयी जनजागृती नाही.

90 percent of women who are pregnant have anemia | प्रसूतीसाठी येणाऱ्या ९० टक्के महिलांना ‘अ‍ॅनेमिया’

प्रसूतीसाठी येणाऱ्या ९० टक्के महिलांना ‘अ‍ॅनेमिया’

असंतुलित आहाराचा परिणाम : रुग्णालयांमध्ये महिला स्त्री रोग तज्ज्ञांचा अभाव
नरेश रहिले गोंदिया
आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आरोग्याविषयी जनजागृती नाही. असंतुलित आहारामुळे जिल्ह्यातील ९० टक्के महिलांना अ‍ॅनेमिया असतो, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या अ‍ॅनेमियामुळे महिलांना विविध आजारांना समोरे जावे लागते.
गोंदिया जिल्ह्यात मुख्य जेवण म्हणजे भात व वांग्याची भाजी आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जेवणात दररोज वरण नसतोच. महिलांना आर्यन (लोह) मिळत नसल्यामुळे त्यांच्यात रक्त कमी तयार होते. परिणामी त्यांना विविध आजारांना बळी पडावे लागते. गोंदिया जिल्ह्यातील २ हजार ८७५ गर्भवती महिलांना अनेमीया असल्याची माहिती सन २०१४ या वर्षात जानेवारी ते डिसेंबर या काळात मिळाली. गर्भवती झाल्यापासून तर प्रसूती होईपर्यंत महिला संकरीत आहार सेवन करीत नसल्यामुळे त्यांना अनेमीया होतो. यामुळे गर्भवती महिलांना प्रसूतीच्या वेळी जीवाशी खेळावे लागते. त्यांच्या नातेवाईकांना रक्ताची जुळवाजुळव करावी लागते. गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश महिला जेवणात भातासोबत वांग्याची भाजी घेतात. त्या शिवाय त्यांच्या जेवणात दुसरे कसलेही प्रोटीन, विटामीन किंवा आर्यन (लोह) राहात नसल्यामुळे महिलांना अ‍ॅनेमिया होतो. याचा त्रास त्या महिलांना प्रसूतीच्या काळात मोठ्या प्रमाणात होतो. आहाराकडे गोंदिया जिल्ह्यातील महिलांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या अनेमीयाला महिला स्वत:हून ओढावून घेतात.
गोंदिया जिल्ह्यात २०१४ या वर्षभरात २ हजार ८७५ महिलांना अ‍ॅनेमिया असल्याने त्यांना प्रसूतीच्या वेळी रक्त द्यावे लागले. जानेवारी ते फेबु्रवारी २०१५ या दोन महिन्यात २४८ महिलांना अ‍ॅनेमिया असल्याचे लक्षात आले. गोंदिया जिल्ह्यात सिकलसेलचेही प्रमाण बरेच आहे. त्यामुळे त्यांना रक्त पुरवठा करण्याबरोबर अनेमिया असलेल्या महिलांना प्रसूतीदरम्यान रक्त पुरवावे लागते. आरोग्याकडे दुर्लक्ष करून वांग्याची भाजी व भातावर जीवन जगणाऱ्या महिलांमध्ये अनेमिया मोठ्या प्रमाणात आढळत आहे. ग्रामीण भागात आळण, कुकसा भाजी, कडी अशा प्रकारे भातासोबत भाजीचा वापर होत असल्यामुळे या भाज्यांमधून लोह, आर्यन व प्रोटिन मिळत नसल्याने महिलांना अनेमिया होतो.
जंक फूडला ठेवा दूर
जंक फूड खाने प्रत्येकाला हाणीकारक आहे. जंक फूडमुळे लोहचे प्रमाण कमी होते. जंकफूड सोबत इतर अन्नातील मुलद्रव्ये शरिरात न राहता त्या बरोबर बोहर पडते. जंक फूड मुळे पोषण आहराकडेही दुर्लक्ष होते. त्यासाठी जंक फूड नाकारण्याचे आवाहन डॉक्टरांकडून नेहमीच केले जाते.
गंगाबाईत उसनवारीवर स्त्रीरोग तज्ज्ञ
वर्षाकाठी सात हजाराच्या घरात प्रसूती करणाऱ्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात शासनाने सात स्त्रीरोग तज्ज्ञांचे पद मंजूर केले. परंतु या रूग्णालयात सद्यस्थितीत एकच स्त्रीरोग तज्ज्ञ कार्यरत आहे. परंतु ते ही कामानिमित्त सुट्टीवर असल्याने उसनवारीवर आणलेल्या दोन स्त्रीरोग तज्ज्ञांना येथे सेवा द्यावी लागत आहे. गंगाबाई स्त्री रूग्णालयात सात पदे मंजूर असतांना डॉ. सायास केंद्र, डॉ. योगेश सोनारे व डॉ. शीतल खंडलेवाल या तिघांना नियुक्ती देण्यात आली आहे. परंतु डॉ. योगेश सोनारे यांचे लग्न असल्यामुळे ते महिनाभरापासून सुट्टीवर आहेत. शितल खंडेलवाल आजारी असल्यामुळे त्याही सुट्टीवर आहेत. एकटे डॉ. सायास केंद्र काम करीत होते. परंतु तेही स्वगावी गेल्यामुळे या रूग्णालयात उसनवारीवर रजेगाव ग्रामीण रूग्णालयातील डॉ. आशा अग्रवाल व केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील डॉ. दुर्गादास पटले यांना आणण्यात आले.
गर्भाशयाचा आजार अनेक महिलांना
गोंदिया जिल्ह्यात पूर्वी लहान वयातच लग्न होत असते. त्या महिला माती व दगड काम मोठ्या प्रमाणात करीत असत त्यामुळे अनेक महिलांचे गर्भाशय खराब होत असल्याचे चित्र आहे. अनेक महिलांचे गर्भाशय खराब झाल्यामुळे त्या गर्भपिशवी काढण्यासाठी गंगाबाईत येतात.

Web Title: 90 percent of women who are pregnant have anemia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.