मीटरमध्ये बिघाडाची ९४ प्रकरणे उघडकीस
By Admin | Updated: November 12, 2014 22:45 IST2014-11-12T22:45:10+5:302014-11-12T22:45:10+5:30
विद्युत तारांवर आकडा लावून वीज चोरी करण्याचे प्रमाण जिल्ह्यात भरपूर असले तरी घरगुती किंवा व्यावसायिक ग्राहकांकडून वीजेच्या मीटरमध्ये बिघाड करून वीज चोरी करण्याचा प्रकारही मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

मीटरमध्ये बिघाडाची ९४ प्रकरणे उघडकीस
भरारी पथकाची कारवाई : ६९ प्रकरणात १७ लाखांचा दंड वसूल
देवानंद शहारे - गोंदिया
विद्युत तारांवर आकडा लावून वीज चोरी करण्याचे प्रमाण जिल्ह्यात भरपूर असले तरी घरगुती किंवा व्यावसायिक ग्राहकांकडून वीजेच्या मीटरमध्ये बिघाड करून वीज चोरी करण्याचा प्रकारही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मीटरमध्ये विशिष्ट धातूचा उपयोग करून मीटरची गती कमी केली जाते, तर कधी घराच्या आतील बोर्डवर एक बटन लावून त्याद्वारे वीज मीटर नियंत्रित केले जाते. ते बटन बंद तर मीटरची गती बंद आणि बटन चालू तर मीटर नियमितपणे फिरणे सुरू होते. भरारी पथकाने १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०१४ या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्हाभरात अशी ९४ प्रकरणे उघडकीस आणली आहेत.
गोंदिया विद्युत विभागांतर्गत येणाऱ्या गोंदिया ग्रामीण, गोंदिया शहर, तिरोडा व गोरेगाव तालुक्यात वीज मीटरमधील बिघाडातून वीज चोरी करण्याची ७४ प्रकरणे उघडकीस आली, तर देवरी विद्युत विभागांतर्गत येणाऱ्या देवरी, सडक/अर्जुनी, आमगाव, सालेकसा व अर्जुनी/मोरगाव तालुक्यांत २० प्रकरणे उघडकीस आली आहेत. भरारी पथकाने अशा एकूण ९४ प्रकरणांपैकी ६९ प्रकरणांतून १७ लाख २ हजार रूपयांचा दंडसुद्धा संबंधित ग्राहकांकडून वसूल केला आहे. मात्र गोंदिया शहरातील ९, गोंदिया ग्रामीण १४, तिरोडा २ अशा गोंदिया विभागातील २५ प्रकरणांत दंडाची रक्कम विद्युत विभागाला अद्याप प्राप्त झालेली नाही. देवरी विभागातील सर्वच दोषींकडून दंडाची रक्कम वसूल झालेली आहे.
वीज चोरीची लहानसहान मिश्र प्रकरणेही अनेक आहेत. गोंदिया विभागामध्ये २९ मिश्र प्रकरणे भरारी पथकाने पकडली. त्यातील दोषींवर ९९ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. देवरी विभागामध्ये २० प्रकरणे असून त्यातील दोषींवर ६५ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे.