८३.४५ टक्के मतदान

By Admin | Updated: November 2, 2015 01:23 IST2015-11-02T01:23:03+5:302015-11-02T01:23:03+5:30

जिल्ह्यातील गोरेगाव, सडक-अर्जुनी, अर्जुनी (मोरगाव) व देवरी या चार नगर पंचायतींसाठी रविवारी (दि.१) मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली.

83.45 percent polling | ८३.४५ टक्के मतदान

८३.४५ टक्के मतदान

गोंदिया : जिल्ह्यातील गोरेगाव, सडक-अर्जुनी, अर्जुनी (मोरगाव) व देवरी या चार नगर पंचायतींसाठी रविवारी (दि.१) मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली. चारही नगर पंचायतींसाठी ८३.४५ टक्के मतदान झाले असून यात महिलांचा पुढाकार दिसून आला. पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने चारही नगर पंचायतींचे मतदान शांततेत पार पडले.
जिल्ह्यातील सहा तालुकास्थळांना नगर पंचायतींचा दर्जा देण्यात आल्याने गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात वेगळेच वळण आले. येथील निवडणुकींना घेऊन अवघ्या जिल्हयाचे लक्ष लागले होते. मात्र आमगाव व सालेकसा नगर पंचायतींच्या निवडणुकांना न्यायायलाने स्थगिती दिल्याने या वरील चार नगर पंचायतींसाठी रविवारी (दि.१) मतदान घेण्यात आले. प्रत्येक नगर पंचायतींच्या १७ जागांसाठी घेण्यात आलेल्या या निवडणुकीत गोरेगाव नगर पंचायतमध्ये ८८.५१ टक्के मतदान झाले आहे. येथे एकूण ६ हजार १७२ मतदारांपैकी ५ हजार ४८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात २ हजार ७३५ महिला असून २ हजार ७२८ पुरूषांचा समावेश आहे.
सडक-अर्जुनी नगर पंचायतमध्ये ८६.७८ टक्के मतदान झाले असून येथे ३ हजार ७३८ मतदारांपैकी ३ हजार २४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये १ हजार ६४४ महिला असून १ हजार ६०० पुरूषांचा समावेश आहे. अर्जुनी नगर पंचायतमध्ये ८२.६९ टक्के मतदान झाले असून ६ हजार ९१९ मतदारांपैकी ५ हजार ७२१ मतदारांना मतदानाचा हक्क बजावला. यात २ हजार ९२० महिला असून २ हजार ८०० पुरूषांचा समावेश आहे.
तर सर्वात मोठ्या देवरी नगर पंचायतमध्ये सर्वात कमी ७९.२४ टक्के मतदान झाले असून येथे ९ हजार ५५३ मतदारांपैकी ७ हजार ५७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ३ हजार ७८७ महिला असून तीन हजार ७८३ पुरूषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देवरी व अर्जुनी-मोरगाव या नक्षलग्रस्त नगर पंचायतींमध्ये दुपारी ३ वाजतापर्यंत मतदानाची वेळ देण्यात आली होती. तर सडक-अर्जुनी व गोरेगाव येथे सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत मतदान करण्यात आले. (ठिकठिकाणच्या तालुका प्रतिनिधींकडून)

आज होणार मतमोजणी
चारही नगर पंचायतींची मतमोजणी सोमवारी (दि.२) होणार आहे. यात गोरेगाव येथे आयटीआयमध्ये सहा टेबलवर तीन राऊंडमध्ये मतमोजणी होणार आहे. सडक-अर्जुनी येथे तहसील कार्यालयात सहा टेबलवर तीन राऊंड, अर्जुनी-मोरगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत नऊ टेबलवर दोन राऊंड तर देवरी येथे तहसील कार्यालयात तीन टेबलवर सहा राऊंडमध्ये सकाळी १० वाजतापासून मतमोजणी होणार असल्याचे कळले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
चार नगर पंचायतींसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त लवण्यात आला होता. यात देवरी व अर्जुनी-मोरगाव हा नक्षलग्रस्त परिसर असल्याने येथे पोलिसांसह सी-६० चा बंदोबस्त लावण्यात आला होता. शिवाय पोलिसांचाही बंदोबस्त असल्याने कोठेही अप्रिय घटना घडल्या नाहीत व मतदान शांततेत पार पडले.
अर्र्जुुनीत मतदारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
येथे नगर पंचायत प्रशासनाकडून एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आल्याचे दिसले. तो असा की, येथील वॉर्ड क्रमांक ३ व ४ करिता असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांच्या स्वागतासाठी रांगोळी टाकण्यात आली होती. शिवाय सर्वप्रथम आलेल्या मतदारांचे तहसीलदार कल्याण डहाट, मंडळ अधिकारी कोहाडकर व अन्य कर्मचाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.

Web Title: 83.45 percent polling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.