८० लाखांचा ‘ठग’ अद्याप बेपत्ता
By Admin | Updated: November 14, 2015 01:58 IST2015-11-14T01:58:58+5:302015-11-14T01:58:58+5:30
विदेशात नोकरी लावणे व पारपत्र (व्हिसा) बनविण्याच्या नावाखाली सुमारे १५० पेक्षा जास्त बेरोजगार युवकांना ठगविणारा ठग घटनेच्या पंधरवड्यानंतरही अद्याप बेपत्ता आहे.

८० लाखांचा ‘ठग’ अद्याप बेपत्ता
पोलिसांची मुंबईवारी : रिकाम्या हाताने पथक परतले
वडेगाव : विदेशात नोकरी लावणे व पारपत्र (व्हिसा) बनविण्याच्या नावाखाली सुमारे १५० पेक्षा जास्त बेरोजगार युवकांना ठगविणारा ठग घटनेच्या पंधरवड्यानंतरही अद्याप बेपत्ता आहे. दरम्यान तपासासाठी मुंबईला गेलेले पोलीस पथक निव्वळ २२ पासपोर्टसह रिकाम्या हाताने परतले.
प्राप्त माहितीनुसार, वडेगाव व परिसरातील सुमारे १५० हून अधिक बेरोजगार युवकांना दुबई व कुवैत या देशात नोकरी लावणे व त्यांचे पारपत्र बनवून देण्याच्या नावाखाली गंडविल्याची घटना २९ आॅक्टोबर रोजी उघडकीस आली. त्यानंतर घटनेतील आरोपी अद्याप बेपत्ता आहेत. या ‘विदेशी ठगीं’मध्ये आरोपी राजकुमार सुकुल साहानी (३४) रा. भटनी, जि. देवरिया (उ.प्र.) याने प्रत्येकाकडून ४० ते ५० हजार रुपये उकळले होते. सुमारे ८० लाख रुपयांची रोकड जमवून तो फरार आहे. सदर घटनेतील दुसरा आरोपी अरुणसिंह विरेंद्रसिंह यास अटक करण्यात आली असून त्यास भंडारा येथील कारागृह ठेवण्यात आले आहे. परंतु त्याच्याकडून अद्याप कुठलीही विशेष माहिती मिळाली नसल्यामुळे प्रकरणाची प्रगती थांबलेली आहे.
दरम्यान अटक झालेल्या आरोपीकडून व ठगविल्या गेलेल्या युवकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथक दि. ५ आॅक्टोबरला तपासासाठी मुंबई रवाना झाले होते. सदर पथकाने आरोपीच्या ठाणे येथील ई-ट्रस्ट या कार्यालयात चौकशी केली.