देवरीच्या एफडीसीएम डेपोतील ८० बीट स्वाहा
By Admin | Updated: April 25, 2017 00:45 IST2017-04-25T00:45:01+5:302017-04-25T00:45:01+5:30
राष्ट्रीय महामार्ग-६ वर वनविकास महामंडळाचा डेपो आहे. या ठिकाणी गुरुवारी (दि.२०) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली.

देवरीच्या एफडीसीएम डेपोतील ८० बीट स्वाहा
विद्युत तारांमुळे लागली आग : नुकसान फक्त एक लाख २० हजारांचे
देवरी : राष्ट्रीय महामार्ग-६ वर वनविकास महामंडळाचा डेपो आहे. या ठिकाणी गुरुवारी (दि.२०) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत डेपोमध्ये ठेवलेल्या लाकडांपैकी जळाऊ लाकडे असलेले ८० बिट लाकडे जळून राख झाले. मात्र एवढ्या भिषण आगीत केवळ एक लाख २० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती वनविकास महामंडळाकडून (एफडीसीएम) देण्यात आली.
देवरीच्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील वनउपज तपासणी नाक्याजवळ वनविकास महामंडळाचा (एफडीसीएम) डेपो आहे. या डेपोमध्ये दोन हजारच्या जवळपास लाकडांच्या बीट आणि दीड हजारच्या जवळपास बांबूचे बंडल ठेवले होते. गुरुवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास या डेपोतून गेलेल्या विद्युत वाहिन्यांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने त्या वाहिन्यांच्या जवळ लागून असलेल्या सागवानाच्या झाडाला आग लागली. सागवनाचे झाड एक ते दिड फूट जळाले. त्यानंतर सागवानाच्या जळालेल्या झाडाचा विस्तव खाली पडल्याने खाली असलेल्या पालापाचोळ्याने पेट घेतला.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने आग जोमात भडकली. वणवा लागून डेपोमध्ये ठेवलेल्या बिटांना आग जोमाने पकडली. ही आग वनमजूर व वनकर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी सुरूवातीला चार टँकर बोलावून पाणी मारले. जेसीबीच्या माध्यमातून माती खोदून इतर बिटांना आग लागणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात आले. या आगीत फक्त ८० बिट जळाऊ लाकडे जळाल्याची माहिती गोंदिया येथील वनविकास महामंडाळ गोंदिया कार्यालयात कार्यरत कर्मचारी बिसेन यांनी दिली. यात एक लाख २० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे ते म्हणाले.
घटनेची माहिती मिळताच वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक पी.जी. नौकरकर, सहाय्यक व्यवस्थापक एस.टी. मेश्राम, देवरीचे वनपरीक्षेत्राधिकारी ए.एम. बडवाईक, ठाणेदार राजेश तटकरे व नगराध्यक्ष यांचे पती बिसेन यांनी घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी मदत केली. या डेपोमध्ये पाच लाखांचे लाकडांचे बिट होते असे सांगितले जाते. वेळीच उपाययोजना केल्यामुळे ते बिट वाचविण्यात त्यांना यश आले.
नुकसानीचा खरा आकडा गुलदस्त्यात?
वनविकास महामंडळाच्या देवरी डेपोला लागलेल्या आगीत ८० बिट लाकडे जळाल्याची माहिती विभागाने दिली. एवढ्या मोठ्या आगीत फक्त एक लाख २० हजार रूपयांचे नुकसान दाखविण्यात आले. परंतु सर्वसामान्य जनतेला हे नुकसान मोठे असल्याचे लक्षात येते. त्यामुळे आपले अपयश दिसू नये यासाठी वनविकास महामंडळ कमी नुकसान तर दाखवित नाही ना, अशी चर्चा आहे.